महाराष्ट्रातही ‘तान्हाजी  द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट ‘टॅक्स फ्री’

17
0
Share:

उद्धव ठाकरे मंत्रिमंडळासोबत हा सिनेमा पाहणार आहे.

मुंबई:उत्तर प्रदेश आणि हरियाणापाठोपाठ महाराष्ट्रातही ‘तान्हाजी  द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट ‘टॅक्स फ्री’ करण्यात आला आहे. ‘तान्हाजी’ करमुक्त करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत  निर्णय झाला. चित्रपट प्रदर्शन झाल्यानंतर तेराव्या दिवशी हा निर्णय घेण्यात आला आहे.

नरवीर तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा सांगणारा ‘तान्हाजी’ हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. तानाजी मालुसरेंची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता अजय देवगणसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कालच ‘तान्हाजी’ पाहणार होते. मात्र त्यांनी मंत्रिमंडळासोबत हा सिनेमा पाहणार असल्याचं स्पष्ट केलं.

मुंबईतील ‘प्लाझा’ चित्रपटगृहात मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि नगरसेवकांसाठी ‘तान्हाजी’ चित्रपटाच्या विशेष खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आधीच नाशिकमध्ये ‘तान्हाजी’ सिनेमा पाहिला.

‘तान्हाजी’ सिनेमात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल, शरद केळकर, अजिंक्य देव, देवदत्त नागे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. कोंढाणा मोहीम फत्ते करताना वीरमरण आलेल्या तानाजी मालुसरेंचा गौरवशाली इतिहास ‘तान्हाजी’ सिनेमातून रुपेरी पडद्यावर साकारण्यात आला आहे.

प्रेक्षकांनी ‘तान्हाजी’ चित्रपट डोक्यावर घेतला असून दहा दिवसात दीडशे कोटींचा गल्ला जमवण्यात चित्रपटाला यश आलं आहे. महाराष्ट्रात ‘तान्हाजी’ चित्रपट ‘टॅक्स फ्री’ करावा अशी मागणी वारंवार केली जात होती.

दरम्यान, ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या ऐतिहासिक कथेशी सहमत नसल्याचं मत चित्रपटात उदयभानची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता सैफ अली खान याने व्यक्त केलं आहे. चित्रपट चालण्यासाठी राजकीय कथा बदलून दाखवण्यात आली आहे. हे अत्यंत धोकादायक आहे, असं सैफ एका मुलाखतीत म्हणाला होता.

Share: