राज ठाकरेंच्या सभांचं इव्हेंट मॅनेजमेंट चांगलं, पण मतं मिळत नाहीत : आठवले

20
0
Share:

 

कल्याण : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचं इव्हेंट मॅनेजमेंट चांगलं असतं. परंतु त्यांचा करिष्मा भाषण ऐकण्यापुरता आहे. त्यांना मतं मिळत नाहीत, असं वक्तव्य रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले  यांनी केलं.

राज ठाकरे यांचा करिष्मा भाषण ऐकण्यापुरता आहे. त्यांनी कल्याण, उल्हासनगरमध्ये सभा घेतल्या. त्यांच्या सभांसाठी चांगलं इव्हेंट मॅनेजमेंट केलं जातं. ते महाराष्ट्रात अॅक्टिव्ह आहेत. चांगले नेते आहेत. परंतु त्यांना हवी तितकी मतं मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना विरोधीपक्षाचं नेतृत्व मिळणार नाही, असं भाकित रामदास आठवलेंनी वर्तवलं.

वंचित बहुजन आघाडीला चांगली मतं मिळाली, पण निवडून येण्यासारखी स्थिती नाही. त्यामुळे तिसरी शक्ती निर्माण होईल असं वाटत नाही. त्यामुळे तिसरा प्रयोग करुन मतं वाया घालवण्यापेक्षा त्यांनी एका आघाडीत सामील व्हाव. त्यांनी महायुतीत यावं, असं आवाहन मी केलं होतं, असंही आठवले म्हणाले. मला सत्ता ही स्वतःसाठी नको असून समाजासाठी हवी आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

कल्याण पूर्व मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गणपत गायकवाड यांच्या प्रचारसभेसाठी रामदास आठवले कल्याण पूर्वेतील दादासाहेब गायकवाड मैदानात आले होते. सभेदरम्यान आठवले यांनी गणपत गायकवाड यांची स्तुती केली. गायकवाड निवडून आले तर कल्याण पूर्वचा विकास होईल, असंही त्यांनी सांगितलं.

गणपत गायकवाड यांनीही भाषणातून विरोधकांवर निशाणा साधला. विरोधी उमेदवाराचं नाव न घेता त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मी निवडणुकीनंतर तक्रार करणार असल्याचं सांगताना काही नगरसेवक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचा दावाही त्यांनी केला.

राज ठाकरे यांनी नाशिकमधील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका केली. “जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी घडू शकत नाही. या जगात फक्त पुरुष गरोदर राहू शकत नाही, या व्यतिरिक्त सर्व काही होऊ शकतं. काही जण आजही (गरोदर) वाटतात’ असा अप्रत्यक्ष टोला राज ठाकरे यांनी लगावला.

 

Share: