कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन सुरू…

Share:

शेतकऱ्यांची घोर फसवणूक नव्या कृषी कायद्यांच्या अधीन झाली आहे. शेतकऱयांच्या मनात भय आहे. अंबानी, अदानी हे दोन उद्योगसमूह शेतीच्या ठेकेदारीत घुसतील व भविष्यात शेतकरी भिकेला लागेल. पंजाब, हरयाणातील रिलायन्स जिओ कंपनीच्या टॉवर्सची शेतकऱ्यांनी तोडफोड करून टाकली. आता रिलायन्स कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे की, आमच्या कंपनीला शेतीवाडीच्या धंद्यात अजिबात रस नाही. अंबानींपाठोपाठ असा खुलासा आता अदानी उद्योगसमूहाने केला तर दिल्लीच्या धगधकत्या सीमा शांत होतील, असं शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून यावर टीका केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन सुरू आहे.
आतापर्यंत शेतकरी आणि सरकार यांच्यामध्ये चर्चांच्या अनेक फेऱ्या झाल्या होत्या. परंतु त्यातून कोणताही मार्ग निघालेला नाही. शेतकरी आंदोलनावरून पुन्हा एकदा शिवसेनेनं टीका केली आहे. आज भाजपाचे केंद्रीय सरकार शेतकऱ्यांना देशद्रोही, दहशतवादी ठरवून मारत आहे. मधल्या काळात बैठक बैठक खेळण्याचा दमदार खेळ सुरूच असल्याची टीका शिवसेनेनं केली आहे.
दिल्लीच्या वेशीवर धडकलेले शेतकरी व सरकारमधील चर्चा पुन्हा निष्फळ झाली आहे. शेतकरी व केंद्रीय मंत्र्यांत चर्चेच्या आठ फेऱया पार पडूनही त्यातून काहीच निष्पन्न होत नसेल तर सरकारला कोणत्याही तोडग्यात रस नाही, शेतकऱयांचे आंदोलन चिघळत ठेवायचे आहे व त्यातच सरकारचे राजकारण आहे. दिल्लीत कडाक्याची थंडी पडली आहे. त्यात तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. शेतकऱयांच्या तंबूत पाणी घुसले असून त्यांचे कपडे, अंथरुणे भिजून गेली आहेत. तरीही शेतकरी मागे हटायला तयार नाहीत. कृषी कायदे रद्द करण्यावर शेतकरी ठाम आहेत. आतापर्यंत दिल्लीच्या सीमेवर 50 शेतकऱ्यांनी मरण पत्करले.

Share: