मुंबई एपीएमसीत हैद्राबाद घटनेच्या पुनरावृत्तीची भीती ?

21
0
Share:
फळ आणि भाजीपाला मार्केटमधून दररोज ७० ते ८० टन ओला कचरा निर्माण होतो-
खत प्रकल्प अंदाजे २० कोटी रूपयांचा असून या प्रकल्पाचे उदघाटन तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ०२ फेब्रुवारी २०११ रोजी केले होते.
खत प्रकल्प कागदावरच राहिल्याने प्रकल्पाचा कब्जा गर्दुल्ले आणि दारुड्यांनी घेतला आहे
नवी मुंबई:एपीएमसी बाजार समितीतील खत प्रकल्प कागदावरच राहिल्याने प्रकल्पाचा कब्जा गर्दुल्ले आणि दारुड्यांनी घेतला आहे. दिवसाढवळ्या दारूच्या पार्ट्या होताना दिसत आहेत. एपीएमसी भाजीपाला मार्केटच्या गेट क्रमांक ७ लगतच हा प्रकल्प उभारण्यात येत आहे.याच गेटमधून पहाटेपासूनच महिलांची ये-जा सुरू असते. पोलिस आणि बाजार समिती प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने हैद्राबाद येथील घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती स्थानिक रहिवासी दिपक जाधव यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ आणि भाजीपाला मार्केटमधून दररोज ७० ते ८० टन ओला कचरा निर्माण होतो. परंतु, खत प्रकल्प रखडल्याने हा ओला कचरा कुजत असून त्यातून दुर्गंधी निर्माण होत आहे. या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट नवी मुंबई महापालिकेच्या डम्पिंग ग्राऊण्डमध्ये लावण्यात येत आहे.
हा प्रकल्प अंदाजे २० कोटी रूपयांचा असून या प्रकल्पाचे उदघाटन तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिरिक्त भाजीपाला मार्केटमध्ये ०२ फेब्रुवारी २०११ रोजी केले होते. उदघाटन होवून ९ वर्षे होत आली परंतु, अद्यापही हा प्रकल्प कागदावरच आहे. हा प्रकल्प रखडल्याने प्रकल्पाच्या जागेचा कब्जा गर्दुल्ले आणि दारोड्यांनी घेतला आहे.
हा प्रकल्प उभारणीच्या निविदा प्रक्रीयेला प्रतिसाद  मिळत नसल्याने हा प्रकल्प रखडला असून २०२० पर्यंत या प्रकल्पाच्या कामाला सुरूवात होईल, बाजार समितीचे सहसचिव अविनाश देशपांडे यांनी अशी माहिती दिली.
Share: