जिल्ह्यातील निपाणी येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार   यांची 600 किलो बियाण्यांचा वापर करत ग्रास पेंटिंग केली आहे. पेरलेल्या बियांपासून अंकुर फुटून आलेल्या पिकात पवारांचे रेखीव चित्र साकारण्या आलं आहे. निपाणी येथील शेतकरी पुत्र मंगेश निपाणीकर याने ही प्रतिमा साकारत पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यासह देशाच्या राजकारणात चाणक्य अशी ओळख असलेल्या शरद पवारांबाबतीत तरुणाईत कमालीची क्रेझ आहे. 80 वर्षाच्या पवारांचा उत्साह हा तरुणाईला प्रेरणा देणारा असून त्यांनी महाराष्ट्रात विधानसभेत मोठे यश मिळवीत राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मोट बांधत सत्ता स्थापन केली. शरद पवारांना जाणता राजा आणि शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाते. शेतकऱ्यांच्या संकटात थेट बांधावर जाऊन विचारपूस करीत धीर देत न्याय देणारे नेतृत्व अशी पवारांची ग्रामीण भागात विशेष ओळख आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील निपाणी येथे मंगेश निपाणीकर या तरुणाने शरद पवार यांची ग्रास पेंटिंग साकारत त्यांना वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. सुरेश आणि बाळासाहेब पाटील या शेतकऱ्यांच्या शेतात भव्य दिव्य अशी ही प्रतिमा एक लाख 80 हजार स्क्वेअर फूट जागेत साकारली आहे. या कलाकृतीचे छायाचित्रण अजय नेप्ते या तरुण चित्रकाराने केले आहे.

शरद पवारांची ही कलाकृती साडे चार एकर जमिनीवर साकारली असून त्यासाठी 600 बियाण्यांचा वापर करण्यात आला आहे. यात 200 किलो अळीव , 300 किलो मेथी , 40 किलो गहू, 20 किलो ज्वारी आणि हरभरा असे धान्य पेरणीसाठी वापरले आहे. पवारांची धान्यातील प्रतिमा साकारण्यासाठी जमिनीची मशागत करून त्यावर पेरणी करण्यात आली. त्यानंतर ते धान्य उगविण्यासाठी योग्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने सिंचनाद्वारे पाणी देऊन उगविण्यात आले. 15 दिवसांच्या या अथक मेहनत आणि प्रयत्नातून पवारांची प्रतिमा साकारली असून ती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. तर सोशल मीडियावर याचे फोटो आणि कलाकृतीचे कौतुक होत आहे.

शरद पवारांचा वाढदिवस विशेष पद्धतीने साजरा करण्यासाठी ही अनोखी पेंटिंग तयार करण्यात आली असून पवारांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन ती पाहावी अशी अपेक्षा मंगेश निपाणीकर आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. पवारांचे शेती क्षेत्राच्या विकासासाठी मोठे योगदान असून एक शेतकरी पुत्र म्हणून शेती पिकातून प्रतिमा साकारून त्यांना शुभेच्छा दिल्याचे मंगेश निपाणीकर म्हणाला.