APMC मार्केटमधील आणखी चौघांना कोरोना, आकडा 18 वर, शनिवारपासून भाजीपाला मार्केट बंद

17
0
Share:

नवी मुंबई : मुंबई एपीएमसीत कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत (Four Corona Patient Found APMC Market) आहे. मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये आणखी  चार व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनाबाधित व्यापाऱ्यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना लागण झाल्याचं म्हटलं जात आहे. दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्याने एपीएमसीमधील भाजीपाला मार्केट शनिवार ( 2 मे) पासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.हे तिन्ही व्यापारी मार्केटमधील E विंगमध्ये व्यापार करत होते. तिघांना कोरोनाची लागण झाल्याने E विंग पूर्णपणे सील करण्यात आली आहे. या तिघांना वाशी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. हे  कोरोनाबाधित व्यापारी जवळपास 40 जणांच्या संपर्कात आले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

“कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने येत्या शनिवारपासून भाजीपाला मार्केट बंद करण्याचा निर्णय भाजीपाला महासंघातर्फे घेण्यात आला आहे”, अशी माहिती भाजीपाला महासंघाचे पदाधिकारी के. डी. मोरे यांनी दिली.

मुंबई एपीएमसी मार्केटमधील कोरोना रुग्णांची संख्या आता 18 वर पोहोचली आहे. नवी मुंबईत एकूण कोरोना रुग्णची संख्या 206 तर मृत्यूची संख्या 5 आहे.

पहिल्यांदा एपीएमसी मार्केटमध्ये 27 एप्रिलला एका भाजीपाला मार्केटमधील व्यापाऱ्याला आणि फळ मार्केटमधील सुरक्षा अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर 28 एप्रिलला एपीएमसी धान्य मार्केटमधील एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली. याआधीही L विंगमधील व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यासोबत मसाला मार्केटमधील व्यापाऱ्याला, एका हॉटेल कर्मचाऱ्याला आणि त्याच्या संपर्कात आलेल्या 6 जणांचा कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एपीएमसी प्रशासनाने मार्केटच्या प्रवेशद्वाराबाहेर सोशल डिस्टन्सिंगसाठी बॅरिकेट्स लावले आहेत. प्रवेशद्वारावर सॅनिटाईझ करुन गाड्यांना आत प्रवेश दिला जात आहे. मात्र, मार्केटच्या आत प्रवेश केल्यावर व्यपारी आणि ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे सोशल डिस्टनसिंगचे नियम येथे पाळले जात नसल्याने कोरोना रुग्णामंध्ये वाढ होत आहे.

एपीएमसीमध्ये कोरोनाचा गुणाकार सुरु झाल्याने नवी मुंबईकरांची डोकेदुखी वाढणार आहे. सध्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यापारी, दलाल, ग्राहक, माथाडी कामगार आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याचे काम पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सुरु झाले आहे.

 

Share: