Ganesh Chaturthi 2020| मुख्यमंत्र्यांकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा, सामाजिक भान ठेवून शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन

6
0
Share:

मुंबई : राज्यभरात आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर कोरोना संकटामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे (CM Uddhav Thackeray wishes of Ganeshotsav 2020).

“सण आणि उत्सवांची बदलेली रुपं आपण पाहिली आहेत. यातील काळानुरुप बदल आपण स्वीकारले आहेत. सामाजिक जागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. कोरोनामुळे जिथं संपूर्ण जग हादरुन गेलं आहे तिथं याविरुद्ध एक मोठा लढा लढण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. यातून एक नवे समाज प्रबोधन आपण करु आणि सामाजिक भान ठेवून शांततेत यंदाचा गणेशोत्सव साजरा करु”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
“गणरायाची प्रतिष्ठापना आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही करत आहोत. मात्र यावेळेस आपल्यासमोर कोरोनाचे विघ्न आहे. या विघ्नातून लवकर मुक्ती मिळावी, तसेच या साथीचा मुकाबला करण्यासाठी कोव्हिड योद्ध्यांना आणि आपल्या सर्वांना शक्ती मिळो, अशी प्रार्थना बाप्पाकडे केली आहे”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं (CM Uddhav Thackeray wishes of Ganeshotsav 2020).

“संपूर्ण उत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी. गाफील न राहाता आतापर्यंत आपण जी काळजी घेतो आहोत तीच पुढेही घ्यावी”, असं आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

“आता ही वेळ नियम पाळून उत्सव साजरा करण्याची आहे. श्रीगणेशाचे आगमन असो किंवा विसर्जन असो, प्रत्येकाने कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या घरात, गल्लीत आणि कॉलनीत होणार नाही याची दक्षता घेणे अत्यावश्यक आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“काही सार्वजनिक गणेश मंडळांनी सामजिक प्रबोधन आणि आरोग्य शिबिर घेण्याचे नियोजन केलं आहे. त्यांचं अभिनंदन करतो. गणेशोत्सवातून सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक, प्रबोधनात्मक संदेश हाती घ्यावा. तसेच मंडळांनी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन दिल्यास अधिक सोयीचे होईल”, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

Share: