मी मराठा समाजाचा सेवक : छत्रपती संभाजीराजे

15
0
Share:

मी मराठा समाजाचा सेवक : छत्रपती संभाजीराजे
– मराठा समाजाच्या बैठकीत व्यासपीठावर बसण्यास नकार

नवी मुंबई : मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर राज्यभरात मराठा संघटनांच्या विविध बैठका आणि आंदोलन होत आहे. आरक्षणाबाबत पुढची दिशा काय असावी त्यासाठी महाराष्ट्र राज्य व विविध संघटनांच्या प्रमुखांची आज स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या माथाडी भवन येथील छत्रपती उदयनराजे भोसले व छत्रपती संभाजीराजे भोसले व माथाडी कामगार नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती.


छत्रपती संभाजीराजे यांनी या राज्यस्तरीय बैठकीला हजेरी लावली, परंतु मुख्य व्यासपीठावर बसण्यास संभाजीराजेंनी नकार दिला, यावेळी संभाजीराजे म्हणाले की, छत्रपतींचा आदर, सन्मान राखत आपण या व्यासपीठावर दोन मोठ्या खुर्च्या ठेवल्या. त्याबद्दल आभारी आहे, मी मोठा नाही तर छत्रपती घराणं मोठं आहे. मात्र हा शिष्टाचार ठेऊ नये, मी याठिकाणी येतो तो मराठा समाजाचा सेवक म्हणून येतो, ज्या ठिकाणी मानपान ठेवायचे तिथे आम्ही पुढाऱ्यांकडून घेतो, परंतु मी सेवक म्हणून या बैठकीला आलो आहे. त्यामुळे माझीसुद्धा खुर्ची समाजासोबत खाली असावी असे त्यांनी सांगितले.


तसेच राजर्षी शाहू महाराज मराठा समाजाच्या एका कार्यक्रमाला गेले होते, तेव्हा त्यांनी सांगितले, मी शेतकरी आहे, तुमचा सेवक आहे. मी तुमच्यातला एक आहे, तेव्हा शाहू महाराजांनी समाजाचा सेवक म्हणून काम केले अशी आठवणही छत्रपती खासदार संभाजीराजेंनी उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितली.
छत्रपती उदयनराजेंनी फिरवली बैठकीकडे पाठ
छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी नवी मुंबईत मराठा आरक्षण बैठकीकडे पाठ फिरवली. मुंबईची वाट न धरता ते थेट नाशिकला गेल्याचे त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी जोरदार पाठपुरावा सुरू आहे. मराठा समाजाचे नेते विविध ठिकाणी बैठका घेत आहेत. शिवसंग्राम पक्षाचे आमदार विनायक मेटे यांनी ३ ऑक्टोबर रोजी पुण्यात बैठक आयोजित केली होती. या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांचे बंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांना देखील निमंत्रण देण्यात आले होते. परंतु याही बैठकीकडे त्यांनी पाठ फिरवली होती.

Share: