IAS Transfer : मुंबई म्हाडा उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांच्यासह राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांची बदली.

5
0
Share:

 

मुंबई : राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या ट्रान्स्फर करण्यात आल्या आहेत. ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह पाच प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली झाली आहे.

मिलिंद म्हैसकर : ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मिलिंद म्हैसकर यांची महसूल आणि वन विभागात प्रधान सचिव (वन) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मिलिंद म्हैसकर हे 1992 च्या बॅचचे अधिकारी आहेत.
संजय खंदारे : अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव संजय खंदारे यांची ‘महाजनको’ (MAHAGENCO) (पूर्वीचे एमएसईबी) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. खंदारे हे 1996 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

उदय चौधरी : औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची मंत्रालय उपसचिव पदावर बदली झाली आहे. विशेष म्हणजे, औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्यांची बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पदभार इतर अधिकाऱ्यांकडे सोपवून उपसचिव पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे आदेश चौधरी यांना देण्यात आले आहेत. उदय चौधरी हे 2010 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

अजय गुल्हाने : नवी मुंबईतील ‘जलस्वराज्य प्रोजेक्ट’चे प्रकल्प व्यवस्थापक अजय गुल्हाने यांची चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी वर्णी लागली आहे. अजय गुल्हाने हे 2010 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. कोरोना काळात चंद्रपूरचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांची अचानक बदली झाल्यामुळे राजकीय-प्रशासकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

के. एच. बगाटे : रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सीईओ के. एच. बगाटे यांची शिर्डीतील साईबाबा संस्थान ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदी नेमणूक करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यातच त्यांची रत्नागिरीत बदली झाली होती.

पुणे जिल्हाधिकारीपद कोणाला?

दुसरीकडे, पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना कारभार प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. पुणे जिल्हाधिकारी पदासाठी मंत्र्यांकडे जोरदार लॉबिंग सुरु असून सध्या चार जणांची नावं चर्चेत आहेत. तर मावळते जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पंतप्रधान कार्यालयातील उपसचिवपदाचा कार्यभार आज (10 ऑगस्ट) स्वीकारला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे. आयुष प्रसाद यांच्याकडे बारा तास जबाबदारी राहण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे नाव सोमवारी रात्री उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र नाव जाहीर होण्यास उशीर झाल्यास कोरोना नियंत्रणावर परिणाम होण्याची भीती आहे.

पुण्याच्या जिल्हाधिकारी पदासाठी सध्या राजेश देशमुख सर्वाधिक प्रबळ दावेदार आहेत. राजेश देशमुख यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. देशमुख हे हाफकिन इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. यापूर्वी त्यांनी यवतमाळ जिल्हाधिकारीपदी काम केलं आहे.

म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश म्हसे, एमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे, लातूर जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांचं नाव चर्चेत आहे. नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि पालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांचं नाव मागं पडलं आहे.

Share: