परतीच्या पावसामुळे 35 हजार हेक्टरवरील पीक पाण्यात,शेतकऱ्यांच्या डोळ्यात फक्त अश्रू

23
0
Share:

सोलापूर: राज्यात सध्या सत्तास्थापनेच्या जोरदार हालचाली सुरु असल्याने सर्वच लोकप्रतिनिधी व्यस्त  आहेत. तर दुसरीकडे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर आला आहे. सोलापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल 35 हजार हेक्टरवरील पिके पाण्यात गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला असून आता डोळ्यात फक्त अश्रू उरले  आहेत.

मान्सून सुरु झाल्यापासून सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे या भागातील सर्वच शेतकरी परतीच्या पावसाकडे आस लावून बसले होते. ऑक्टोबरमध्ये सोलापूरमध्ये 70 मिमी पाऊस अपेक्षित होता. मात्र तब्बल 174 मिमी पाऊस महिनाभरात झाला.

सरासरीच्या तुलनेत 250 टक्के पाऊस यंदा जास्त पडला. त्यामुळे जिल्ह्यातील 35 हजार 344 हेक्टरवरील पिकं पाण्यात गेली आहेत. तसेच तूर, कांदा, मका, सोयाबीन, केळी, बोर, सुर्यफूल, कांदा आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान नुकसानग्रस्त भागात पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा गावात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सुरेश साठे यांच्या शेतातील सोयाबीनचा अक्षरश: बाजार उठला आहे. सोयाबीनच्या पिकावर बघितलेल्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. त्यांना शेतातही धड जाता येत नाही आणि आपली व्यथा कोणापुढे मांडताही येत नाही. त्यांच्या शेतात गुडघाभर पाणी साचले आहे.

अशीच अवस्था गावातील आणखी एका शेतकरी कुटुंबाची झाली आहे. जवळपास दोन एकर कांदा पाण्यात गेला आहे. तर काही कांदा जमिनीतच सडतो आहे. गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळाची दाहकता अनुभवली. यंदा कांद्याला चांगला भाव येईल असं वाटतं असताना पावसाने घात केला. त्यामुळे पुन्हा एकदा सगळं संपल्यात जमा झाला आहे.

Share: