कृषी शिक्षणात मुलींचा टक्का वाढता

20
0
Share:

कृषी विभागासह प्रशासकीय सेवेतील नोकऱ्या तसेच कृषिपूरक व्यवसायाच्या संधींची शाश्वती असल्यामुळे कृषी तसेच संलग्न अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या मुलींच्या संख्येत वाढ झाली आहे. सद्यःस्थितीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत घटक (शासकीय) आणि संलग्न (खासगी) महाविद्यालयामध्ये पदवी ते पीएच.डी.पर्यंतच्या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या मुलींचे (विद्यार्थिनी) प्रमाण २४.९२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. विविध शासकीय महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींचे प्रमाण ३७.८५ टक्के आहे. परभणी येथील शासकीय कृषी महाविद्यालयातील मुलेची प्रमाण सर्वाधिक ४२.२३ टक्के आहे.

बारावीनंतर वैद्यकीय (मेडिकल), अभियांत्रिकी( इंजिनिअरींग) या व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे ग्रामीण-शहरी भागातील मुलां-मुलींचा ओढा वाढला आहे. त्यापाठोपाठ कृषी विभागासह प्रशाकीय सेवेतील नोकऱ्या तसेच खासगी कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्या, बॅंका, विमा कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधीची शाश्वती, ३० टक्के राखीव जागा, तसेच शैक्षणिक शुल्कमाफीमुळे कृषी तसेच संलग्न अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या मुलींची संख्या वाढत आहे.

मराठवाड्यामध्ये १९५६ मध्ये परभणी येथे कृषी महाविद्यालयाची स्थापना झाली. सुरवातीच्या काळात या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींची संख्या बोटावर मोजण्याएवढी देखील नसायची. काही वर्षांपूर्वी कृषी पदवी अभ्यासक्रम जणू काही मुलांची मक्तेदारी मानली जायची. जेमतेम ५ ते १० मुली कृषी पदवीसाठी प्रवेश घेत असत. त्यातही उत्तर पूर्व आणि दक्षिणेतील राज्यातील मुलींची संख्या अधिक असे.

परभणी येथील कृषी महाविद्यालयामध्ये कृषी पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता २१० एवढी आहे. २००८-०९ मध्ये कृषी पदवीस प्रवेश घेतलेल्या मुलींची संख्या ५९ होती. गेल्या ११ वर्षांमध्ये मुलींच्या संख्येत दरवर्षी वाढ झाली. २०१८-१९ मध्ये मुलींची संख्या १०४ पर्यंत वाढली आहे. २०१३-१४ ते २०१७-१८ या पाच वर्षांमध्ये परभणी कृषी महाविद्यालयातून ३३९ मुलींनी कृषी पदवी (बी.एस्सी), १२५ मुलींनी पदव्युत्तर पदवी (एम.एस्सी) आणि ३८ मुलींनी पीएच.डी. पदवी संपादन केली.

सध्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत घटक आणि संलग्न महाविद्यालयातील एकूण १६ हजार ५८२ हून अधिक विद्यार्थ्यांपैकी ४ हजार १३३ (२४.९२टक्के) मुली आहेत. १२ घटक महाविद्यालयामध्ये एकूण ३ हजार ८१२ विद्यार्थ्यांपैकी १ हजार ४४३ (३७.८५ टक्के) मुली आहेत. सर्व खासगी महाविद्यालयांमधील ८ हजार ३४९ विद्यार्थ्यांपैकी १ हजार ८४९ (२२.१४ टक्के) मुली आहेत. केवळ कृषी महाविद्यालयातील मुलींची संख्या विचारात घेतली असता, सर्व ६ शासकीय कृषी महाविद्यालयामध्ये एकूण २ हजार ६५१ विद्यार्थ्यांपैकी १ हजार १८ (३८.४१ टक्के) मुली आहेत. तर २१ खासगी कृषी महाविद्यालयातील एकूण ८ हजार ३४९ विद्यार्थ्यांपैकी १ हजार ८४९ (२२.१४ टक्के) मुली आहेत. गुणवत्तेमध्येही मुली अव्वल क्रमांकावर आहेत.

Share: