कापूस पणन महासंघाच्या अध्यक्षांचा राजीनामा

22
0
Share:

महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाच्या अध्यक्षा उषा शिंदे यांनी अवघा वर्षभराचा कालावधी पूर्ण झाला असतानाच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच पणन महासंघावर महिला अध्यक्षांची नियुक्‍ती झाली होती आणि हे पद उत्तर महाराष्ट्राच्या वाट्याला आले होते.

महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाचे अध्यक्षपद तब्बल १२ ते १३ वर्ष राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. एन. पी. हिराणी यांच्याकडे होते. गेल्या वर्षी पणन महासंघाच्या अध्यक्षपदाची धुरा उत्तर महाराष्ट्रातील महिला नेतृत्वाकडे सोपविण्यात आली. त्या माध्यमातून येवला (जि. नाशिक) येथील उषाताई शिंदे यांची अध्यक्षपदी नियुक्‍ती करण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यातील कॉँग्रेसचे प्रसन्नजीत पाटील यांच्याकडे उपाध्यक्षपद आहे.

उषा शिंदे यांनी कापूस पणन महासंघाच्या कामकाजाची माहिती घेत अनेक सुधारणांचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले होते. या प्रस्तावांना मान्यता मिळण्याआधीच त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. पणन महासंघात अध्यक्ष, उपाध्यक्षांसह १७ संचालक आहेत. यामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वाधिक सदस्य असल्याने अध्यक्षपद त्यांच्याकडे राहते.

पक्षश्रेष्ठींचे आदेश की वैयक्तिक कारण
पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरूनच पणन महासंघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि त्यांचा कार्यकाळ निश्‍चित होतो. उषा शिंदे यांनी पक्षाच्या आदेशावरूनच राजीनामा दिला तर उपाध्यक्ष प्रसन्नजित पाटील यांनाही लवकरच पक्ष आदेश प्राप्त होऊ शकतात, अशी चर्चा आहे. प्रसन्नजित पाटील यांनीही त्यास दुजोरा दिला; उषा शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

Share: