दक्षिण आफ्रिकेतील मलावी हापूस मुंबई एपीएमसीत दाखल

14
0
Share:

नवी मुंबई : भारतीय आंब्यांचा सिजन हा फेब्रुवारी ते मे दरम्यानचा आहे. त्यानंतर आंब्यांचे उत्पादन केले जात नाही. मात्र आता दिवाळीतही हापूस आंब्यासारखे दिसणारे व चवीलाही हापूस आंब्यासारखेच असणारे दक्षिण पूर्व अफ्रिकेतील मलावी देशातील हापूस आंबे एपीएमसी फळ मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. सध्या एपीएमसी फळ मार्केटमध्ये एकूण आंब्याचे १५०० बॉक्स विक्रीसाठी आले आहेत. कोकणातील हापूस आंब्यांचे बियाणे मलावी देशातील शेतक-यांनी नेले होते. तेथील हापूस आंबा आता विक्रीसाठी मार्केटमध्ये येऊ लागला आहे.

यावर्षी पावसामुळे कोकणातील हापूस आंब्याचा मोहर उशीरा येण्याची शक्यता आहे. अशा पार्श्वभूमीवर विदेशातील हापूस विक्रीसाठी येत असल्यामुळे सर्वांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मलावी हा दक्षिण पूर्व अफ्रिकेतील दीड कोटी लोकसंख्या असलेला देश आहे. या देशातील हवामान कोकणाप्रमाणे आहे. आठ वर्षांपासून कोकणातील रत्नागिरी व दापोली या भागातून हापूस आंब्याची बियाणे दक्षिण आफ्रिकेतील मलावी देशात नेऊन १५०० एकर मध्ये झाड लावून त्याचे उत्पादन घेण्याची सुरुवात करण्यात आली. तीन वर्षांपासून या हापूस आंब्यांची आयात भारतात केली जात असून पुण्यातील सनशाईन नावाची कंपनी हे हापूस आंबे भारतात आयात करते असे एपीएमसी फळ मार्केट संचालक संजय पानसरे यांनी सांगितले आहे.

दिवाळीच्या मूहूर्तावर विक्रीसाठी हे आंबे बाजारात दाखल झाले असून त्यांचा बाजारभाव हा ७०० ते ९०० रुपये प्रतिकिलो आहे. मलावी देशातील या हापूस आंब्यांचा सिजन साधारण ४५ दिवसांचा म्हणजेच नोव्हेंबर ते डिसेंबर एवढा असून आता दिवाळीतही लोकांना हापूस आंब्याची चव चाखता येणार आहे.

Share: