महाराष्ट्रात नविन व स्थिर सरकार स्थापन होवो! मनसे शुभेच्छा!”,राजू शेट्टी

6
0
Share:

महाराष्ट्रात नविन व स्थिर सरकार स्थापन होवो! मनसे शुभेच्छा!”,राजू शेट्टी

राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना आज घडली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवनात हा शपथविधी पार पडला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं अभिनंदन केलं. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अशाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.

राज यांच्या मनसेने यंदा विधानसभेच्या १०० जागा लढवल्या. मात्र त्यापैकी केवळ एकाच जागेवर मनसेला विजय मिळवता आला.
कल्याण ग्रामीण मतदारसंघातून मनसेच्या राजू पाटील यांनी अटीतटीच्या लढाईत बाजी मारली. शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांचा पराभव करत राजू जिंकून आले. त्यानंतर त्यांना मध्यमंतरी ‘तुमचा पाठिंबा कोणाला?’ असा सवाल पत्रकारांनी केला. या प्रश्नाला राजू यांनी अगदी मोजक्या शब्दात उत्तर दिले होते. “राज ठाकरे जी भूमिका घेतील त्यानुसार आपण निर्णय घेणार आहोत. त्यांनी दिलेल्या आदेशानुसारच मी कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय घेणार आहे,” असं राजू यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र आजच्या शपथविधीनंतर राजू पाटील यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी ‘मनसे शुभेच्छा’ दिल्या आहेत. राजू यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन “महाराष्ट्रात नविन व स्थिर सरकार स्थापन होवो! मनसे शुभेच्छा!”, असं ट्विट केलं आहे.
विधानसभेमध्ये मनसेचे एकमेव शिलेदार असून मनसे राज्यातील सत्तासंघर्षामध्ये काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर आजच्या राजकीय भूकंपानंतर राजू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्थिर सरकारसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Share: