ई-पीक पाहणीचे अंतिम दोन दिवस; त्वरा करा
१५ ऑगस्ट २०२१ पासून खरीप हंगामाच्या ई-पीक पाहणी उपक्रमाला सुरुवात करण्यात आली होती. या उपक्रमांतर्गत खरीप हंगामामध्ये जवळजवळ ९८ लाख शेतकऱ्यांनी पिकांची अचूक नोंद केली. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई देखील मिळाली. आता रब्बी हंगामात देखील हीच पद्धत अवलंबण्यात येत असून यासाठी अंतिम मुदत १५ फेब्रुवारी असून आता फक्त शेतकऱ्यांकडे दोन दिवसाचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. ईपीकपाहणी कशी करावी याबाबत खरीप हंगामामध्ये बऱ्याच प्रमाणात जनजागृती झाल्याने आता ही ऑनलाइन प्रक्रिया शेतकऱ्यांनाही झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांची नोंद करण्याचे आवाहन कृषी आणि महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
ई-पीक पाहणी या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. याबाबत कृषी आणि महसूल विभागाच्या माध्यमातून खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती मात्र रब्बी हंगामातील पिकांची नोंद करताना अपडेट ॲप घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आता पीक नोंदीसाठी तलाठ्याची वाट न पाहता शेतकऱ्यांना सातबारा उतारावर पिकांची नोंद करता येणार आहे. त्यामुळे भविष्यामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान झाले. तरी या माध्यमातुन नुकसानभरपाई मिळू शकणार आहे. यावर्षी पावसामुळे रब्बी हंगामातील पेरण्या खूपच उशिरा झाल्या होत्या.
त्यामुळे पीक नोंदणीसाठीची मुदत देखील वाढविण्यात आली होती. आता ही मुदत १५ फेब्रुवारी असून या दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांची नोंद करावी लागणार आहे. निसर्गाचा लहरीपणाचा प्रत्यय यंदा शेतकऱ्यांना आलेला असल्यामुळे जर भविष्यामध्ये काही नैसर्गिक आपत्ती आली तर नुकसानभरपाईसाठी ही ई-पीक पाहणी नोंदणी हेच अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.