Russia-Ukraine War: रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम सांगत व्यापाऱ्यांकडून तेल दरवाढ; किलोमागे १० ते १५ रुपयांची वाढ
जगात कुठेही युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यास आपल्या देशात लगेच त्याचा परिणाम पाहायला मिळतो. मागील काही दिवसांपूर्वी तालिबानने अफगाणिस्थान ताब्यात घेतले होते तेव्हा देखील आपल्याकडे त्याचा परिणाम दिसून आला. त्यावेळी दुसऱ्याच दिवशी सुक्यामेव्याची दरवाढ झाली होती. तर आता दोन दिवसांपूर्वी चालू झालेल्या रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा परिणाम देशात पाहायला मिळाला असून तेल दरवाढ झाल्याचे मुंबई एपीएमसी मधील तेल व्यापारी सांगत आहेत. तर किलोमागे १० ते १५ रुपयांची दरवाढ घाऊक बाजारात झाली आहे. तर किरकोळ बाजरात दुप्पट भावाने विक्री केली जात आहे. त्यामुळे सामान्य जनतेला त्याचा मोठा फटका बसणार असे दिसते.
सूत्रांनी सांगितल्या प्रमाणे सध्या मोठ्या प्रमाणात तेल साठा आहे. गोदामांमध्ये आणखी काही महिने तेल पुरेल एवढा तेलसाठा असेल तर युद्ध सुरु होताच तेल दर का वाढतात असा सवाल सामान्य लोकांकडून विचारला जात आहे. गेली दोन वर्षांपासून कोरोना परिस्थितीने लोकांचे हाल झाले आहेत. अनेक लोक आजही त्या परिस्थितीतून बाहेर पडले नाहीत. तर काही लोकांचा नियमित रोजगार सुरु झाला नाही. त्यामुळे आता येणारी महागाई जनतेची आणखी बिकट परिस्थिती निर्माण करणार असे दिसत आहे.
घाऊक बाजारात १५ किलोचे दर
सध्या पूर्वी
सूर्यफूल तेल २३५० २१५०
शेंगदाणा तेल २५०० २४००
पाम तेल २१५० २०५०
सोया तेल २३०० २२००
किरकोळ बाजारात १किलोचे दर
सूर्यफूल १६० १५०
सूर्यफूल १५० १४०
सोयाबीन १३० १४०
पामतेल १२५ १३०