मुंबई APMC फळ मार्केटमध्ये अनधिकृत व्यापारी आणि मार्केट उपसचिवांची छुपी युती ?
पहिले नोटीस, नंतर मिटिंग आणि शेवटी सेटिंग!
मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये अनधिकृत व्यापार जोमात असून या व्यापाऱ्यांना छुपा आधार मिळत असल्याची चर्चा बाजार आवारात सुरु आहे. त्यामुळे अनधिकृत व्यापारी जोमात असून परिसर बकाल झाला आहे. आशिया खंडातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फळ मार्केट सध्या अनधिकृत व्यापार आणि बेकायदा वास्तव्याचा अड्डा झाला आहे. शिवाय या सगळ्या प्रकारांना संबंधित अधिकारी पाठीशी घालत असल्याचे सांगण्यात येत आहे. तर या सर्व गैरप्रकारांवर मार्केट संचालक गप्प का? असा सवाल बाजार घटक करत आहेत.
नियमांनुसार फळ मार्केटमध्ये केळा व्यापार करता येत नाही. मात्र, या ठिकाणी अंदाजे २० व्यापारी हा व्यवसाय अनधिकृतपणे करत आहेत. याबाबत APMCNEWS ने बातमी दाखवल्यावर प्रसिद्धी माध्यमात बातमी आली, या कारणाने व्यापाऱ्यांना एपीएमसी प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली. तरीसुद्धा हे व्यवसाय पॅसेजचा वापर करून राजरोसपणे सुरु असल्याने मार्केट उपसचिव यांनी अभद्र युती करून मार्केटमध्ये अनधिकृत व्यापार आणि पेढ्यांवर अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या लोकांना सूट दिली आहे.
मार्केटमधील अनधिकृत व्यापार, कागदी पुठा, गवत व लाकडी पेट्या बनवणाऱ्या जागेत शेड बांधून कब्जा करण्यात आला आहे. या ठिकाणी राहत असलेल्या लोकांपैकी अनेकवेळा काही गुन्हेगार पोलिसांनी अटक केले आहेत. तरी प्रशासनाला जाग येत नसल्याने यामागे मोठे आर्थिक देवाणघेवाणीचे गणित असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय मार्केटच्या सेसचा झोल अद्याप सुरुच आहे.
त्यामुळे कारवाई हा फक्त दिखावा असल्याचे स्पष्ट होत असून भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामुळे फळ मार्केटची मोठ्या प्रमाणात बदनामी सुरु आहे.   या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर कारवाई करणार असल्याचे सभापती अशोक डक यांनी एपीएमसी न्यूजशी बोलताना सांगितले.