नाताळ, नववर्ष स्वागताचे कार्यक्रम टाळा, महापालिकेचं आवाहन; नव्या सूचना जारी
मुंबई: नाताळ आणि नववर्ष जवळ आला आहे. त्यातच लग्न समारंभांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे महापालिकेने नागरिकांसाठी काही सूचना जारी केल्या आहेत. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताचे कार्यक्रम टाळा, लग्न समारंभात होणारी गर्दी टाळा, असे आवाहन महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केलं आहे.
ओमिक्रॉनचा संसर्ग जगभरात वेगाने फैलावत असून त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण होऊ लागला आहे. कोविडची तिसरी लाट येऊ नये म्हणून शासन आणि प्रशासन वारंवार आवाहन करत असतानाही त्याचे बहुतांश ठिकाणी योग्यरित्या पालन केले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. विशेषतः लग्न समारंभ आणि इतर समारंभांमध्ये नियम मोडले जात असल्याचे आढळते आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी शासनाने आखून दिलेल्या मर्यादांचे योग्य पालन करावे, कोणत्याही प्रकारची गर्दी टाळावी, मास्क लावण्यासह कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, प्रत्येकाने लसीकरण पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहन महानगरपालिका इकबाल सिंह चहल यांनी केले आहे. या नियमांची पायमल्ली करणऱ्यांवर महानगरपालिकेच्या विभाग कार्यालय स्तरावरील पथकांकडून तसेच पोलीस प्रशासनाकडून सक्त कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
तर टाळेबंदीची वेळ येईल
सर्व जनतेचे सहकार्य, काटेकोरपणे केलेले कोविड व्यवस्थापन आणि कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला दिलेला वेग यामुळे मुंबईतील कोविड संसर्ग परिस्थिती आज संपूर्णपणे नियंत्रणात आहे. मात्र, ओमिक्रॉन या नवीन विषाणू प्रकारामुळे जगातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. या देशांमध्ये टाळेबंदीची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतात तसेच महाराष्ट्रात अशी स्थिती उद्भवू नये म्हणून अनुक्रमे केंद्र व राज्य सरकारने जनतेला सातत्याने आवाहन करुन खबरदारी घेण्याची विनंती करण्यात येत आहे, असं त्यांनी निदर्शनास आणून दिलं.
मुंबईकरांनो दक्षता घ्या
महानगरपालिका प्रशासनाने देखील मुंबईकरांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र, त्याला पुरेसा प्रतिसाद मिळालेला नाही. विशेषतः लग्न समारंभ आणि इतर समारंभांचे आयोजन करताना नियमांची पायमल्ली करुन गर्दी केली जात आहे. समाजावर प्रभाव असणाऱ्या नामांकित व्यक्ती, प्रतिष्ठित नागरिक यांनी देखील सर्व बाबींचे भान राखणे आवश्यक आहे. कोणीही आणि कोणतेही नियम मोडलेले आढळले तर, प्रशासनाने आता पुन्हा एकदा कठोरपणे कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी स्पष्ट केलं.
राज्याच्या मुख्य सचिवांनी 27 नोव्हेंबर 2021 रोजी आदेश निर्गमित करुन सार्वजनिक मर्यादा आखून दिलेल्या आहेत. तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर भारतीय दंड विधान संहितेनुसार तसेच साथरोग व्यवस्थापन कायदा आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्याबाबत मुंबई पोलीस प्रशासनाने १४ डिसेंबर २०२१ च्या आदेशांन्वये स्पष्ट केले आहे. या दोन्ही आदेशातील सूचनांचे योग्य ते पालन होणे आवश्यक आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
गर्दी वाढल्याने नव्या सूचना
येत्या काही दिवसांमध्ये नाताळ तसेच नवीन वर्ष प्रारंभ पार्श्वभूमीवर समारंभ आणि सोहळ्यांचे आयोजन झाल्यास गर्दी होण्याचा धोका आहे. तसेच लग्न व इतर समारंभांच्या आयोजनातून वाढत असलेली गर्दी रोखणे गरजेचे झाले आहे. एवढेच नव्हे तर, हॉटेल्स आणि उपहारगृह व इतर सार्वजनिक आस्थापनांमध्ये देखील गांभीर्याने नियम पाळले जात नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे महापालिकेने काही सूचना केल्या आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
या सूचनांचे पालन करा
> > बंदिस्त सभागृहांमध्ये आयोजित होणारे कोणतेही कार्यक्रम / समारंभ / उपक्रम या ठिकाणी, त्या सभागृहाच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के व्यक्तिंनाच उपस्थितीची परवानगी आहे.
> > मोकळ्या / खुल्या जागेत होणाऱ्या कार्यक्रम / समारंभ / उपक्रमासाठी सदर जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के एवढ्याच संख्येने उपस्थितीला परवानगी असेल.
> > मात्र, खुल्या / मोकळ्या जागेतील कोणत्याही आयोजनात एक हजारापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणार असतील तर, त्या संदर्भात स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला आगावू सूचना देऊन त्याबाबतची पूर्व मंजुरी प्राप्त करणे अत्यावश्यक आहे.
> > सर्व हॉटेल्स्, उपहारगृह, सिनेमागृह, इतर सर्व शासकीय व खासगी आस्थापना आदी सर्व ठिकाणी उपस्थितींच्या नियमांसह कोविड प्रतिबंधात्मक निर्देशांचे सक्तीने पालन करण्यात यावे.
> > सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेऊन आपले लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह इतर सार्वजनिक ठिकाणी देखील कोविड लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच योग्य ती मुभा असेल. अन्यथा नियमानुसार कारवाई केली जाईल.
> > सार्वजनिक ठिकाणी / आस्थापनांमध्ये कार्यरत सर्व मनुष्यबळाचे तसेच कार्यक्रम / समारंभांमध्ये सर्व उपस्थितांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. त्याचे उल्लंघन केल्याचे आढळले तर संबंधित आस्थापनांवर नियमानुसार योग्य ती दंडात्मक कारवाई केली जाईल.
> > मुखपट्टी (मास्क) चा योग्यरितीने वापर करणे, हातांची नियमित स्वच्छता राखणे आणि सुरक्षित अंतर राखणे, सर्व परिसर / खोल्या / > > प्रसाधनगृहे यांची वेळोवेळी स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करणे यासह कोविड प्रतिबंधक सर्व बाबींचे प्रत्येक नागरिकाकडून काटेकोर पालन करण्यात यावे.
> > नाताळ (ख्रिसमस), नवीन वर्ष स्वागतासाठी पार्ट्यांचे आयोजन करणे टाळावे, समारंभांमध्ये गर्दी करु नये, कोविड प्रतिबंधात्मक वर्तन राखावे, असे आवाहन पुनश्चः एकदा इकबाल सिंह चहल यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे.