भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील कोरोना पॉझिटिव्ह,
नवी मुंबईः माजी मंत्री आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. आपल्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली. गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी कोरोना तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
हिवाळी अधिवेशनातील दोघांना कोरोना
नुकत्याच 28 डिसेंबर रोजी समाप्त झालेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी अहमदनगर येथील रुग्णालयात कोरोना तपासणी केली असता त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले. दोन दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोना झाल्याचे उघड झाले होते. त्यादेखील अधिवेशनात उपस्थित होत्या. त्यामुळे कोरोनाचे हे लोण आता आमदारांमध्ये पसरते की काय अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
सुप्रिया सुळे यांचे संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह
कालच 29 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, पती सदानंद सुळे व त्यांची दोन्ही मुले कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी आली होती. सुप्रिया सुळे यांनीही ट्विटरद्वारे ही माहिती दिली होती. आपली व कुटुंबियांची प्रकृती स्थिर असून संपर्कातील व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन त्यांनी केले होते.
बाबांनो काळजी घ्या, उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबईसह राज्यात वेगाने पसरणाऱ्या कोरोनाला गांभीर्याने घ्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आज केले. ते म्हणाले, ‘सुप्रियाच्या तर सगळ्या घराला कोरोनाची लागण झाली आहे. अजूनही अनेक लोक मास्क न घालता फिरतायत. बाबांनो माझी विनंती आहे, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाची लाट येणार आहे. खूप काळजी घेण्याची गरज आहे. अधिवेशनात मी सभागृहात आल्यापासून ते घरी जाईपर्यंत मास्क लावलेला असतो. बोलतानाही काढत नाही. आपल्याला नियम पाळावेच लागणार आहेत. आपणच नियम पाळणार नाही तर नियम सांगण्याचा अधिकार मला नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाचं स्वागत बाहेर न करता, घरातच करा.’