BREAKING:घणसोलीतील अट्टल दरोडेखोर जेरबंद; १५ दिवसांनंतर ५ जण ताब्यात!
नवी मुंबई:घणसोली येथील अंबिका ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा पडल्याची घटना १४ नोव्हेंबरला घडली होती. या घटनेला काही दिवस उलटून देखील पोलिसांकडून गुन्ह्याचा उलगडा न झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, १५ दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर नंतर ५ जणांना अटक करण्यात
नवी मुंबई गुन्हे शाखेला यश आले आहे. तीन जण अद्याप फरार असून लवकरच त्यांना त्याबात घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींकडून जवळपास १ किलो सोने आणि काही चांदी हस्तगत करण्यात आली आहे. आरोपींमध्ये दोन व्यक्ती याच व्यवसायातील कारागीर असून उर्वरित अट्टल गुन्हेगार आहेत. आयुक्त बिपीनकुमार सिंग व गुन्हे उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई गुन्हे शाखेच्या १८ ते २० कर्मचाऱ्यांचे पथक यांनी दिवसरात्र तपास करून हि कामगिरी फत्ते केली. जवळपास ७०० सीसीटीव्हीचे परीक्षण करून आरोपींना राजस्थान येथून जेरबंद केले. तर नवी मुंबई गुन्हे शाखेची २०२१ मधील सर्वात मोठी कामगिरी असल्याचे बोलले जात आहे.
सीसीटीव्ही निकृष्टदर्जाचे असल्याने पोलिसांना तपासात मोठा अडथळा निर्माण होत होता. याच परिस्थितीचा फायदा घेत घणसोली येथून रिक्षाने ठाणे व तेथून राज्यस्थानमध्ये या दरोडेखोरांनी पलायन केले होते. दुकानाचा डीव्हीआर आरोपींनी काढून नेला होता. त्यात परिसरात सुद्धा लागलेल्या सीसीटीव्हीत आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्याने आरोपींसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. तर सीसीटीव्हीच्या निकृष्टतेमुळे आरोपीना राज्याबाहेर जाणे सहज शक्यता होत असल्याचे स्पष्ट होत आहे.