मुंबई APMCफळ मार्केटमधील सीसीटीव्ही बंद; मार्केट उपसचिव म्हणतात हम नही सुधरेंगे
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ मार्केटमध्ये सातत्याने अनेक दुर्घटना घडल्या आहेत. शिवाय आता येऊ घातलेल्या आंबा हंगामात मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढणार असल्याने बंद सीसीटीव्ही सुरु करण्याची मागणी बाजार घटक करत आहेत. या पूर्वी चोरी, हाणामारी आणि स्फोटक वरून गाडी जाळण्या सारख्या घटना बाजार आवारात घडल्याने बाजार घटक भयभीत झाले आहेत. त्यामुळे आंबा हंगामाच्या तोंडावर बंद असलेले सीसीटीव्ही सुरु करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र मार्केट उपसचिव या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचे बाजार घटक सांगत आहेत.
फळ मार्केट परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्याने स्फोटाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली नव्हती. शिवाय आता आंबा हंगाम आल्याने छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांसह लाखो लोकांची ये-जा फळ मार्केटमध्ये असणार आहे. या धर्तीवर लोकांच्या जीवावर बेतणाऱ्या घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच चोरीच्या घटनांमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे हि मागणी बाजार घटक करत आहे. शिवाय भीषण स्फोटाचा ३० वर्षात पहिल्यांदा प्रकार घडल्याने बाजार घटक भीतीच्या छायेत आहेत. त्यावेळी परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्याने पोलिसांना तपासणी करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते.
फळ मार्केटमध्ये आमदार निधीतून २५ लाख रुपये खर्च करून सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. परंतू त्याची योग्य देखभाल एपीएमसी प्रशासनाने न केल्याने हे सीसीटीव्ही बंद पडले आहेत. त्यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार अशा काही घटनांना जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. तर या घटनेनंतर सुद्धा एपीएमसी प्रशासन जागे न झाल्यास मोठी दुर्घटनेची शक्यता वर्तवली जात आहे.