CM Shinde | अडीच वर्षात रखडलेली कामे आम्ही मार्गी लावली सीएम शिंदेंनी वाचला विकासकामांचा पाढा
CM Shinde | 'अडीच वर्षात रखडलेली कामे आम्ही मार्गी लावली' सीएम शिंदेंनी वाचला विकासकामांचा पाढा
नवी मुंबई : अडीच वर्षाचे सरकार आणि अडीच महिन्याचे सरकार यात फरक आहे. गेल्या अडीच वर्षात जे झालं नाही ते आम्ही अडीच महिन्यात केले. मी राजकीय भाष्य करणार नाही, तसे मला देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मी जरी मुख्यमंत्री असलो तरी सोबत अनुभवी देवेंद्र फडणवीस आहेत, असे सांगत न कळतपणे रिमोट फडणवीसांच्या हातात असल्याचे एकनाथ शिंदे यांनी कबूल केले.सरकारला जनतेचा पाठिंबा आहे .नवी मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 89व्या जयंतीनिमित्त आयोजित माथाडी कामगारांच्या मेळाव्या प्रसंगी (Mathadi Melava) बोलत होते. अण्णासाहेबांनी व्यवस्थित केलेल्या मांडणीमुळे आज माथाडी कामगारांना सुगीचे दिवस आल्याचे म्हणत शिंदेनी माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी जाहीर निवड केली.
माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी आपल्या भाषणात बोलताना, "दरेकर आता अध्यक्ष झाले आहेत तर मुंबई बॅंकेतून आम्हाला 250-300 कोटी रुपये कर्ज मिळालंच पाहिजे. आमचा माथाडी कामगार सर्व कर्ज फेडेलसुद्धा याचीही मी यावेळी खात्री देतो." असं माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी म्हटलं. त्यावर दरेकरांनी “बोलताय का दम देताय?“ असं मिश्कीलपणे विचारल्यावर "दम देणारा माणूस मी वाटते का?" असं म्हणत हातच जोडले.
नरेंद्र पाटलांकडून मुख्यमंत्र्यांवरही स्तुतीसुमनं:
"शिंदे साहेब मी आपल्याबद्दल फारसा बारीक अभ्यास केला नाही. पण, मी धर्मवीर पिक्चर बघितला आहे. दिघे साहेबांचे तुम्ही कार्यकर्ते आहात. तुमच्या एकनिष्ठेला मी सलाम करतो. म्हणूनच तुम्ही शिवसेनेचे खरे वारसदार आहात" अशा शब्दात नरेंद्र पाटलांनी मुख्यमंत्र्यांचं कौतूक केलं.
देवेंद्र फडणवीसांनी दिलं कर्जाचं आश्वासन:
"पैसे द्यावेच लागतील हा प्रेमाचा दम आहे. माथाडी कामगार यांच्या घरा करता लागेल तेवढा पैसे मुंबई बँक देईल. माथाडी कामगारांचे उर्वरित प्रश्न मी स्वतः , मुख्मंत्री आणि कामगार मंत्री आम्ही मिळून सोडवू. आण्णा साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आम्ही पुन्हा उभे करू. 50 हजार मराठा तरुणांना उद्योजक होण्यासाठी संधी मिळाली. हे काम सातत्याने सुरू राहिले असते तर आणखी मराठा तरुण उद्योजक बनला असता."
काय म्हणाले मुख्यमंत्री?
- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना करण्याची विनंती मी मान्य करतो.
- हे सरकार घेणारं सरकार नाही तर देणारं सरकार आहे.
- राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे जोमाने काम करणार आहे.
- काल काही लोक बोलले सत्यमेव जयते.
- आम्ही सत्यासाठी आहोत.
- आम्ही चूक दुरुस्त केली आणि तुम्ही ती मान्य केली.
- हे सरकार देवेंद्रजी आणि मी फाईल आडवायची अस कोणतं ही काम आम्ही केलं नाही.