मुंबई APMC फळबाजारात चिकूची आवक वाढली; ग्राहकांचा अल्प प्रतिसाद
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये चिकूचा हंगाम सुरु झाला असून बाजारात चिकूची आवक चांगलीच वाढली आहे. चिकूचे दर देखील आवाक्यात असल्याने ग्राहकांचा चिकू खरेदीला प्रतिसाद मिळत असल्याचे व्यापारी प्रकाश शिंदे यांनी सांगितले. पुणे, नगर आणि सातारा जिल्ह्यातून चिकू बाजारात येत आहेत. तर जुन्नर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, राहुरी या ठिकाणाच्या गावरान चिकूंना बाजारात चांगलीच मागणी आहे. शिवाय सातारा, नगर आणि पालघर जिल्ह्यातील डहाणू, बोर्डी व घोलवड या ठिकाणाहून चिकूची आवक बाजारात होत आहे.
APMC फळ मार्केटमध्ये ५०० ते ७०० क्विंटल चिकूची आवक होत आहे. तर चिकूच्या प्रतवारीनुसार २०० ते ५०० रुपये प्रतिबॉक्स विक्री केली जात आहे. रेल्वेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात चिकू विक्री होत असते. मात्र, सध्या रेल्वेतील विक्रेते कमी झाल्या कारणाने तसेच कोरोना निर्बंधांच्या धाकधुकीमुळे बाजारात ग्राहक कमी आहे. तर काही चिकूला पुरेशी मागणी तर काही चिकू फारच कमी भावात विक्री करावे लागत असल्याचे व्यापारी सांगत आहेत.