अवकाळी पावसाने घेतला चिमुकल्याचा बळी; शेतकरी हवालदिल
अवकाळी पावसामुळे केवळ रब्बी- खरिपातील पिकांचे तर नुकसान झाले आहेच पण चिमुकल्याचाही जीव घेतला आहे. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात धुसडा नवेगाव शिवारात आजोबांसोबत म्हैशी राखण्यासाठी गेलेल्या ९ वर्षीय नातवाचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला आहे. तर शेतामध्ये दावणीला बांधलेल्या बैलही दगावला आहे. त्यामुळे अवकाळी पावसाने केवळ रब्बी आणि खरिपातील पिकांचेच नुकसान झाले नाही तर मनुष्यहानीही झाली आहे. नयन परमेश्वर पुंडे असे मृत मुलाचे नाव आहे. मंगळवारी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस आणि गापपिटीने थैमान घातले होते. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.
जनावरे चारण्यासाठी नयनचे आजोबा रोज शिवारातील पडीक क्षेत्रावर जात होते. मंगळवारी त्यांच्यासोबत नातू नयनही गेला होता. म्हैस चारत असताना अचानक विजेचा कडकडाट झाला व वीज नयनच्या अंगावर कोसळली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरीकडे गोठ्यातील दावणीला बांधलेल्या बैलही दगावला आहे. त्यामुळे पुंडे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला असून या दुर्देवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात होती.
रब्बीचा पेरा होऊन १५ दिवसांचाच कालावधी लोटलेला होता. पिकांची उगवण होताच झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, ज्वारी या पिकांचे नुकसान होत आहे. दुसरीकडे भाजीपालाही पाण्यात आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन त्वरीत नुकसानभरपाई देण्याचा मागणी आता शेतकरी करीत आहेत. मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती कामे तर खोळंबलेली आहेतच पण शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पेरणीसाठी केलेला खर्च आणि आता खरिपातील पिकांचे होणारे उत्पादन असा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे.
भंडारा जिल्ह्यात पुन्हा एकदा हवामान खात्याने दिलेला अंदाज़ खरा ठरला असून काल भंडारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. तुमसर व मोहाड़ी तालुक्यात अनेक ग्रामीण भागात काल गारपीट झाली असून ह्या गारपीटीने रब्बी पिकांचे व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मोहाडी तालुक्यात उसरी, लोहारा, गायमुख, सोरणा, जांब व कान्द्री तर तुमसर तालुक्यातिल पवनार व अनेक ग्रामीण भागात गारपीट झाली आहे. यात शेतकऱ्यांचे रब्बी पिकासह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. या नुकसानी चे पंचनामे करून नुक्सान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहे.