कोरोना अलर्ट: मुंबईत कोरंटाईन, गुजरातमध्ये RT-PCR आवश्यक तर नवी मुंबईत विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची RT-PCR दर दिवसाआड
तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिका सज्ज
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे नवी मुंबईचीही चिंता वाढली आहे. मुंबई एपीएमसी परिसर मागील कोरोना लाटेत कोरोना प्रसाराचा हॉटस्पॉट बनला होता. त्यामुळे एपीएमसी मार्केटवर महापालिकेची नजर असून लवकरच पुढील उपाययोजना सुरु करण्यात येणार आहे. या मार्केटमध्ये मुंबईसह विविध उपनगरातून लोकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरु असते. शिवाय निर्बंध शिथिल झाल्यापासून कोरोना नियमांची सर्रास पायमल्ली परिसरात सुरु आहे. त्यात परदेशातून विविध वस्तूंची आयात मार्केटमध्ये होत असल्याने एपीएमसीमधूनच तिसऱ्या लाटेचा प्रसार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आयुक्त अभिजित बांगर यांच्या बैठकांवर बैठका सुरु असून दुसऱ्या लाटेप्रमाणेच तिसऱ्या लाटेसाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत.
नव्या व्हेरियंट पासून खबरदारी म्हणून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर नजर ठेवण्यास सुरुवात झाली आहे. दक्षिण आफ्रिकेत आलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे युरोपियन देशांमध्ये हाहाकार माजवला असून देशातील आरोग्य यंत्रणा सावध झाली आहे. याबाबत गेली दोन दिवसांपासून महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठका सुरु असून या व्हेरियंटचा सामना करण्यात महापालिका सज्ज झाली आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर दर दिवसाआड करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.
मागील वर्षी फिलिपाईन्स देशातून नवी मुंबईत आलेल्या व्यक्तीमुळे कोरोनाचा मोठा प्रसार झाला होता. तर लाखो लोक बाधित होऊन हजारो लोकांचे बळी   गेले आहेत. सध्या येऊ घातलेल्या नाताळ आणि ख्रिस्ती नववर्षाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून अनेक नागरिक देशात येण्याची शक्यता आहे.
परदेशामधून येणाऱ्या प्रवशांच्या जिनोम सिक्वेन्सिंग टेस्ट करण्यावर पालिका भर देणार आहे. आगामी नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून अनेक नागरिक भारतात येण्याची शक्यता आहे.
युरोपीय देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढत असताना तेथून येणारे प्रवासी बाधित असल्याचे आढळल्यास त्यांच्या जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्या (जिनोम सिक्वेन्सिंग) करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला असून याबाबत आता नवी मुंबई महापालिका नियोजन करत आहेत. या देशांमधील जिनोम सिक्वेन्सिंग अहवालही देण्याची मागणी कोरोना टास्क फोर्सकडे केली जात आहे. नव्या स्ट्रेनबाबत चर्चा आणि पुढील नियोजनासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि नवी मुंबई महापालिका प्रशासनाची महत्वाची व्हीसी बैठक घेतली आहे.