नवी मुंबईत कोरोनाचा विस्फोट; एका दिवसात रुग्ण हजारपार
नवी मुंबईत कोरोनाचा विस्फोट झाला असून दुसऱ्या लाटेनंतर पहिल्यांदाच रुग्णांच्या आकडेवारीने हजारांचा टप्पा ओलांडला आहे. नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागामार्फत प्राप्त अहवालानुसार काल शहरात 1 हजार ७२ रुग्ण आढळून आले आहेत. तर एकूण ऍक्टिव्ह रुग्ण ३ हजार ४०४ झाले आहेत. प्रतिदिन रुग्णसंख्या जवळपास दुपटीने वाढत असल्याने पालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. शिवाय स्थानिक दवाखाने रुग्णांनी तुडुंब भरलेले दिसत आहेत.
महापालिके तर्फे कोरोना केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. शहरात १५०० बेड उपलब्ध करण्यात आले होते. मात्र, रुग्णसंख्याचे वाढत आकडा पाहता हे बेड देखील कमी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना देखील कोरोना लागण होत असल्याने नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. मात्र अनेक नागरिकांना त्यांचा निष्काळजीपणा घातक ठरत असल्याचे दिसत आहे. तर पालिकेकडून १२०० ऑक्सिजन बेड देखील तयार ठेवण्यात आले आहेत. झपाट्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे कोरोना तपासण्या वाढवण्यात आल्या होत्या. परिणामी मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या समोर येऊ लागली आहे. अँटीजेन आणि आरटीपीसीआर तपासण्यांमध्ये वाढ करण्यात आली असल्याचे आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.
ओमिक्रॉनची भीती आणि कोरोनाचा अतिजलद होणारा संसर्ग पाहता आगामी काही दिवस अतिधोक्याचे ठरू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. या काळाता कोरोना रुग्णांची संख्या अचानक कितीहि  पटीने वाढू शकते अशी भीती वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासन सज्ज झाले असून शहरात तपासण्यांवर भर देण्यात येत आहे.
राज्य शासनाने विद्यार्थ्यांची काळजी म्हणून शाळा बंद केल्या आहेत. तरी सुद्धा नवी मुंबईत आठवडा बाजार सुरु आहेत. अनेक बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. एपीएमसी मार्केटमध्ये सुद्धा कोरोना नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. यावर पालिका प्रशासन कोणतीच कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे हा रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. महापालिका आणि पोलीस प्रशासन याबाबत कठोर कारवाई करत नसल्याने उपद्रवी नागरिकांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात आणायची असेल तर प्रशासनाने कठोर कारवाई करणे आवश्यक असले पाहिजे.