नवी मुंबईत कोरोनाचा आकडा वाढतच; प्रशासनाचे कारवाईकडे मात्र दुर्लक्ष
नवी मुंबईत कोरोनाचा विस्फोट झाला असून ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा ४ हजार ६८५ झाला आहे. नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागामार्फत प्राप्त अहवालानुसार काल शहरात 1 हजार ३२४ रुग्ण आढळून आले आहेत. प्रतिदिन रुग्णसंख्या मोठया झपाट्याने वाढत असल्याने पालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. तर केवळ ४३ रुग्ण प्रतिदिन कोरोनमुक्त होत असल्याने पालिका आरोग्य विभागाचा ताण वाढत आहे. यात सर्वात जास्त रुग्ण नेरुळ विभागात आढळून आल्याने विभागातील गर्दींच्या ठिकाणी कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्याच्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांसोबत मॅरेथॉन बैठक पार पडली आहे. त्यामुळे निर्बंध अधिक कडक करण्यात येणार आहेत. तसेच गर्दीच्या ठिकाणी निर्बंधात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, नवी मुंबईत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अनेक ठिकाणी नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे.
नवी मुंबईत अत्यावश्यक सुविधांच्या नावाखाली अनेक बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. एपीएमसी मार्केटमध्ये सुद्धा कोरोना नियमांची सर्रास पायमल्ली केली जात आहे. या सर्व प्रकारांवर पालिका प्रशासन कोणतीच कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे रुग्णसंख्येचा विस्फोट असाच वाढत राहील असा अंदाज व्यक्त होत आहे. महापालिका आणि बाजार समिती कठोर कारवाई करत नसल्याने उपद्रवी नागरिकांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे. बाजार समितीमधील अनावश्यक गर्दीमुळे APMC मार्केट कोरोनाचा हॉटस्पॉट बनण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.