नवी मुंबईत ओमीक्रॉनचा धोका वाढू लागल्याने APMC मार्केटमध्ये महापालिका आयुक्तांच्या भेटीची मागणी
ओमीक्रॉनचा प्रसार वाढत असून नवी मुंबईसह APMC मार्केटमध्ये ओमीक्रॉनचा धोका वाढू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सध्या शहरात ओमीक्रॉनचे २ रुग्ण आढळले असून कोरोना रुग्णसंख्या देखील वाढू लागली आहे. गेली काही दिवसांपासून कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने नागरिकांनी नियम बाजूला ठेवून जगायला सुरुवात केली होती. मात्र, कोरोना संपला नसून तिसऱ्या लाटेची शक्यता सरकारने व्यक्त केली होती. आणि शेवटी ओमीक्रॉनने आपला संसर्ग वाढवण्यास सुरुवात केली असून राज्यासह देशात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढीस लागली आहे.
या धर्तीवर महापालिका प्रशासनाने विभागीय दक्षता पथकाची नेमणूक केली असून २ दिवसात जवळपास ३ लाख रुपये दंड वसूल केला आहे. परंतू या विशेष पथकांना एपीएमसी मार्केट दिसत नसल्याचा टोल बाजार घटकांनी लावला आहे. त्यात कोरोनाची रुग्णसंख्या महिन्यात दुप्पट झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. तर आरोग्य विभागावरील ताण वाढू लागला आहे. बेलापूर विभागातील रुग्णसंख्या अधिक असली तरी एपीएमसी मार्केटमध्ये लाखो लोकांची ये-जा प्रतिदिन होत असते. त्यामुळे रुग्णसंख्येचा भडका होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते. परंतू APMC मार्केटमध्ये कोरोना नियमांना हरताळ फासण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे नवी मुंबईची चिंता वाढली असून नववर्षाच्या पार्शवभूमीवर निर्बंध कडक करण्यात  आले आहेत. 
नवी मुंबईमध्ये नोव्हेंबर अखेरपर्यंत कोरोना रुग्णसंख्या कमी होऊ लागली होती, दोन नागरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील सक्रिय रुग्णांची संख्या शून्यावर आली होती. १ डिसेंबरला रुग्णसंख्या २५२ वर आली होती. यानंतर रुग्णवाढ व कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत फरक पडत गेला आहे. प्रतिदिन रुग्णसंख्या वाढू लागली असून सद्यस्थितीमध्ये सक्रिय रुग्णांचीसंख्या तब्बल पाचशेवर गेली आहे. सर्वच नागरी आरोग्य केंद्राच्या परिसरात प्रादुर्भाव वाढत आहे. बेलापूर, नेरूळ, कोपरखैरणे, घणसोली या परिसरात नवीन रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य  विभागाच्या बैठका वाढविल्या असूनसर्वांना उपाययोजना वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. रात्री ९ ते सकाळी ६ दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षाजास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंधने घातली आहेत. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहात एकावेळी १०० व खुल्या जागेत २५० पेक्षा जास्त नागरिक आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. कोरोना चाचणीच्या संख्येतही वाढ केली आहे. सरासरी ८ ते १० हजार चाचण्या नियमित केल्या जात आहेत.