नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य; ग्राहकांचे स्वागत कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी
२०२२ या नववर्षाला सुरुवात झाली असून अनेकांनी नववर्षाच्या संकल्पांची यादीही केली आहे. शिवाय लोकांकडून जमेल त्या माध्यमातून नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. मात्र, मुंबई एपीएमसी भाजीपाला घाऊक बाजारात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कचऱ्यांचे ढिगारे पाहायला मिळाले. त्यामुळे बाजार घटकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कोरोनासह विविध आजारांनी सध्या डोके वर काढले आहे. ओमीक्रॉनचे संक्रमण वाढीस लागले असून पुन्हा तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. परंतू असे असून सुद्धा व्यापारी स्वछतेकडे दुर्लक्ष करत आहेत.
नवीन वर्ष्याच्या शुभेच्छा देउन चमकणाऱ्या या व्यापाऱ्यांना घाणीचे साम्राज्य दिसत नाही का? असा सवाल देखील बाजरी घटक करत आहेत. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले गेले आहे. मात्र हेच व्यापारी कोरोना नियम पाळत नसल्याचे बाजार घटक सांगत आहेत. तर नियम पळाले जावेत, बाजार घटकांचे जीव जाऊ नयेत म्हणून कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याचेही सांगण्यात येत आहे. तर बाजार आवारात बॅनर लावणाऱ्यांकडून स्वच्छतेकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे.
आशिया खंडातील शिखर बाजारपेठेची स्वछता टिकून राहण्यासाठी या लोकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. नवी मुंबई महापालिके तर्फे स्वच्छता सर्वेक्षण २०२२ सुरु झाले आहे. परंतू मार्केटमध्ये हे अभियान सुरु झाले असे कोणतेही चित्र दिसत नसल्याने मुंबई बाजार समिती नवी मुंबईमध्ये येत नाही का असा सुद्धा सवाल केला जात आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. तरीसुद्धा बाजारात किरकोळ व्यापार, गाडी धक्क्यावर खाद्यपदार्थ विक्री यामुळे गर्दी आणि घाणीचे साम्राज्य वाढत आहे.
स्वच्छतेबाबत महापालिकेकडून वारंवार जनजागृती करण्यात येत आहे. तर कचरा कुंडीत टाका असे आवाहन सुद्धा केले जाते. मात्र बाजार आवारात कचरा कुंडीच नसल्याने व्यापाऱ्यांकडून कचरा रस्त्यावर टाकण्यात येतो. यात मोठ्या प्रमाणात बाजार समितीला सेस न भरणाऱ्या अनाधिकृत व्यापाऱ्यांकडून कचरा होताना दिसत आहे. परिणामी बाजार समिती प्रशासनावर ताण वाढत आहे.