अजित दादांना फडणवीसांचं ट्रेनिंग? मॅनेजमेंटचा गुरुमंत्र, फी घेणार की मोफत?
अजित दादांना फडणवीसांचं ट्रेनिंग? मॅनेजमेंटचा गुरुमंत्र, फी घेणार की मोफत?
नवी मुंबई :राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना (Ajit Pawar) भाजप नेते देवेंद्र फडणवीसांचं (Devendra Fadanvis) ट्रेनिंग. मॅनेजमेंटचा गुरुमंत्र हे ऐकून विचित्र वाटेल. पण अजितदादांनीच अशा ट्रेनिंगची मागणी केलीय. फडणवीसांनी हा गुरुमंत्र देऊ, असंही म्हटलंय आणि त्यावर फी किती घेणार, असा सवालही अजित दादांनी विचारलाय. ही वक्तव्य आलीयत, पण ती राजकीय खेचाखेचीतून. शिंदे सरकार (CM Eknath Shinde) स्थापन झाल्यानंतर दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले. त्यातही काहींना दोन जिल्हे तर फडणवीसांचा सहा जिल्हे देण्यात आले. यावरून अजित दादांनी फडणवीसांवर खोचक टीका केली.
अजित पवार म्हणाले, पालकमंत्री असताना फक्त पुणे जिल्हा माझ्याकडे होता तर नाकी नऊ यायचं… पण फडणवीसांकडे तर सहा जिल्हे दिलेत. कसं काय जमतं यांना… मला तर पुण्याचं पालकमंत्री पद सांभाळतानाच नाकी नऊ आले…
यावर देवेंद्र फडणवीसांनीही चपखल उत्तर दिलंय. ते म्हणाले, ‘ मी गुरुमंत्र देतो… कधी त्यांचं राज्य आलंच तर दोन-तीन-चार जिल्हे कसे मॅनेज करायचे हे शिकवेन….
फडणवीसांनी हे सहा जिल्हे त्यांच्याकडे का आहेत, याचंही स्पष्टीकरण दिलं. हे सहा जिल्हे नियोजन मंत्री म्हणून माझ्याकडे आहेत. मी तर अख्खा महाराष्ट्र सांभाळलाय, त्यामुळे सहा जिल्ह्यांचं काय घेऊन बसलात? असा सवाल फडणवीसांनी केला.
यानंतर अजित पवारांनीही पुन्हा वक्तव्य केलं. ते म्हणाले, मी आता त्यांना पत्र पाठवणार आहे. ट्रेनिंगला कधी येऊ? काही फी आहे का मोफत आहे, त्याबद्दल मी पण त्यांच्याशी हितगुज करतो. ट्रेनिंग घेतो आणि माझ्या ज्ञानात भर घालतो…
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि राजकीय वर्चस्वाची जीवघेणी स्पर्धा यांमध्ये हल्ली नेत्यांनी टीकेची अगदी खालची पातळी गाठलीय. पण अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या अतिशय मुरलेल्या आणि कुणालाही न दुखावता केलेल्या वक्तव्यांतून उत्तम वाक्तचातुर्य दिसून आलंय. राजकीय वर्तुळात आज ही वक्तव्य तुफान चर्चेत आहेत.