राज्यातील काही जिल्ह्यात जादा दराने खत विक्री; कृषी विभागाची जोरदार कारवाई
रब्बी हंगामात शेतकऱ्यांची खतांना मागणी असल्याने काही खत विक्रेत्यांकडून जादा दराने खत विक्री करण्याचा प्रकार समोर आला आहे. या बाबत नाशिक जिल्ह्यात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कृषी विभाग सावध झाला असून जादा दराने खते विक्री करणाऱ्या ७ विक्रेत्यांवर परवाने निलंबनाची कारवाई केल्याची माहिती जिल्हा मोहीम अधिकारी अभिजित जमधडे यांनी दिली. एकीकडे खतांची टंचाई असल्याने शेतकऱ्यांना मागणीनुसार खतांचा पुरवठा होत नसल्याची स्थिती आहे. त्यातच आवंटन मंजूर झाल्यानुसार विक्रेत्यांकडे जो साठा उपलब्ध होतो. त्याची शेतकरी मागणी होत असताना काही विक्रेते जादा दराने विक्री करून शेतकऱ्यांची लूट करण्याचा प्रकार समोर आहे. असे करताना शेतकऱ्यांना कच्ची बिले देऊन मनमानी सुरू आहे. त्यावर गुणवत्ता व नियंत्रण विभाग सावध झाला आहे.
कृषी विभागाच्या पथकाने या बाबत स्वतः ग्राहक बनून जात शहानिशा केली असता असा प्रकार सुरू असल्याचे सिद्ध झाले आहे. यावर कृषी विभागाकडून केलेल्या कार्यवाहीच्या आधारे सटाणा, येवला व निफाड तालुक्यांतील ७ विक्रेत्यांवर कारवाई करत परवाने निलंबित केले आहेत. या मध्ये सटाणा तालुक्यातील बुंधाटे (ता. सटाणा) येथील समर्थ कृषी भांडार, येवला येथील साईराज अॅग्रो एजन्सी, लासलगाव (ता. निफाड) येथील कृषिमित्र अॅग्रो व भंडारी ब्रदर्स, पालखेड (ता. निफाड) येथील स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र, विजय अॅग्रोटेक एजन्सी आणि मेधणे कृषी सेवा केंद्र या सात दुकानांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
काही ठिकाणी खते विक्रीत लिंकिंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खते खरेदीत गैरप्रकार टाळण्यासाठी पक्के बिले घ्यावीत, विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना रास्त दरात खते विकून सहकार्य करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.