कोरोनाचा नवा विषाणू किती भयंकर, पुन्हा निर्बंधाचे चक्र सुरू होण्याची भीती, सरकारने दिल्या काही सूचना…
कोरोनाचा एक नवा आणि आतापर्यंतचा सर्वाधिक बदल किंवा उत्परिवर्तन (म्युटेशन) झालेला विषाणू आढळला आहे. या नव्या B.1.1.529 विषाणूला जागतिक आरोग्यसंघटनेने ओमायक्रॉन - Omicron हे ग्रीक नाव दिलं आहे. या विषाणूचा समावेश WHO ने 'Variant of Concern' म्हणजेच काळजी करण्याजोग्या व्हेरियंटच्या यादीत केला आहे.या विषाणूमध्ये झालेल्या म्युटेशनची यादी एवढी मोठी आहे की, एका शास्त्रज्ञांनी त्याचं वर्णय "भयावह" विषाणू असं केलं आहे. तर दुसऱ्या एका शास्त्रज्ञांनी आतापर्यंतचा कोरोना विषाणूचा हा सर्वांत वाईट प्रकार असल्याचं म्हटलं आहे.केंद्रीय आरोग्य सचिवांनी याबाबत सर्व राज्यांना एक पत्र जारी केलं आहे. तर राज्य कोरोना टास्क फोर्ससुद्धा याबाबत सतर्क झाला आहे.  आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही याबद्दल भीती व्यक्त केली आहे. शाळा सुरू करायच्या की नाही, यावर उद्या निर्णय होणार आहे. देशातही अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. हे पाहता राज्य सरकारने 27 नोव्हेंबर रोजी एक परिपत्रक काढून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार काही सूचनाही दिल्या आहेत. त्या अशा…
1) आता आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर केला जाईल. त्यानुसार सर्व आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांना सामान्य वेळेनुसार किंवा स्थानिक किंवा इतर सक्षमांनी ठरविलेल्या नियमानुसार परवानगी दिली जाईल.
2) कोविडच्या नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन नाही केल्यास मार्गदर्शक तत्त्वानुसार योग्य तो दंड आकारला जाईल आणि कारवाई केली जाणार आहे. त्यानुसार एखादा मेळावा अथवा कार्यक्रम आयोजित केला. तिथे येणाऱ्यांची संख्या 1 हजार व्यक्तींपेक्षा जास्त असेल, तर त्याची माहिती स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला द्यावी लागेल. हा विभाग अशा ठिकाणी ही माहिती खरी आहे की खोटी आहे, यासाठी आपले प्रतिनिधी पाठवू शकतो. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होईल.
3) आपत्ती व्यवस्थापन आयोजन कायद्यानुसार निर्बंध कडक करता येतील. मात्र, त्यानुसार 48 तास अगोदर माहिती देण्यात येईल. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस होऊन 14 दिवस झालेल्या व्यक्तीचेच लसीकरण झाल्याचे समजण्यात येईल. त्यात दुसऱ्या डोस काही वैद्यकीय कारणामुळे घेतला नसेल, तर त्यासाठी मान्यता प्राप्त डॉक्टरांचे प्रमाणपत्र लागेल. यात फक्त 18 वर्षांखालील व्यक्तीला लसीकरणातून सूट असेल.
4) आपल्या संस्था, कॅम्पस आणि इतर ठिकाणीही कोणत्याही ठिकाणी साऱ्यांनी कोविड नियमाचे पालन करावे लागेल. ते जर नियमाचे पालन करत नसतील, तर त्यासाठी संस्थेला सुद्धा जबाबदार धरण्यात येईल, असे कळवण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेचा हा निर्णय
दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या करोनाच्या नव्या आणि सर्वाधिक धोकादायक विषाणूमुळे मुंबई महापालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या की, दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला क्वारंटाईन करावे, असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. या प्रवाशांची चाचणी केल्यानंतर आलेले नमुने जेनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले आहे.