पनवेल APMC मार्केटमध्ये कोट्यवधी रुपयांची भ्रष्टाचारवर झाडाझडती सुरु
पनवेल APMC मार्केटमध्ये कोट्यवधी रुपयांची भ्रष्टाचारवर झाडाझडती सुरु
- चार जणांच्या पथकाकडून कारभाराची चौकशी
- संचालक मंडळ आणि तत्कालीन सचिव येणार अडचणीत
- संचालक मंडळ बरखास्ती नंतर प्रशासक नियुक्ती
नवी   मुंबई : पनवेल APMC मार्केटमध्ये   १५९ गाळ्यांना परवानगी असताना बाजार समिती प्रशासनाने २०२   गाळे कसे बांधले?? असा सवाल करीत ४२ बेकायदा गाळे   तातडीने पाडावेत तसेच बाजार समितीमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार तक्रारींची   हिवाळी अधिवेशनामध्ये   प्रश्न उपस्थित झाल्यानंतर चौकशी सध्या वेगाने सुरू झाली आहे.   बाजारनिधी परवानगीशिवाय बचत खात्यात ठेवून समितीचे नुकसान करणे यांसह बेकायदा गाळे, कर्मचारी भरती आदीच्या चौकशीसाठी चार जणांच्या पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.
पनवेल APMC बाजार आवारात व्यापाऱ्यांना अडथळे ठरणाऱ्या गाळ्यांविरोधात स्थानिक शेतकऱ्यांनी तक्रार केली होती. सुरुवातीला गाळे हटविण्यास नकार देणारे सचिव आणि संचालक मंडळाला संबंधित प्रकरण नागपूर येथील हिवाळी अधिवेशनापर्यंत गेल्यानंतर माघार घ्यावी लागली. सध्या हे प्रकरण केवळ बेकायदा गाळ्यांपर्यंत मर्यादित राहिले नसून बाजार समितीतील इतरही तक्रारींची चौकशी लावण्यात आली आहे. एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आलेले बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली.
तसेच पणन संचालकाच्या परवानगीशिवाय पनवेलच्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेत बचत खाते उघडून पैसे ठेवले. मोठी रक्कम झाल्यानंतर रक्कम मुदतठेव म्हणून जमा करणे गरजेचे होते, परंतु, रक्कम बचत खात्यात ठेवल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. कर्नाळा बँक अडचणीत आल्यामुळे बाजार समितीचे ७ कोटी ३ लाख २० हजार रुपये बँकेत अडकून राहिले असा ठपका ठेवण्यात आला. एवढी मोठी रक्कम अडकून राहण्यास संचालक मंडळ जबाबदार असल्याचेही म्हटले आहे. वेगवेगळ्या प्रकरणांची चौकशी २७ जानेवारी आणि १४ फेब्रुवारीदरम्यान पूर्ण करायची असल्यामुळे चौकशी वेगाने सुरू आहे.