महागाईच्या दरात जवळपास २ टक्क्याची वाढ; पेट्रोल, डिझेल, विज दरवाढीचा फटका
देशाच्या महागाईत मागील महिन्यात काही टक्क्यांची वाढ झाली. ठोक महागाई १२.५४ टक्क्यांवरून थेट १४.२ टक्क्यांवर पोहोचली आहे. पेट्रोल, डिझेल आणि विजेच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे महागाईवर त्याचा मोठा परिणाम होत असल्याचे पहायला मिळत आहे. सध्या महागाई गेल्या १२ वर्षांतील उच्चस्थरावर आहे. सप्टेंबरमध्ये ठोक महागाईचा दर १०.६६ टक्के होता, त्यामध्ये वाढ होऊन तो ऑक्टोबरमध्ये १२.५४ टक्क्यांवर पोहोचला तर नोव्हेंबरमध्ये १४.२ टक्क्यांवर पोहचला आहे.
मंगळवारी जाहीर झालेल्या नोव्हेंबर महिन्यातील आकडेवारीनुसार अन्न-धान्य आणि खाण्या पिण्याच्या गोष्टींमध्ये ३.०६ टक्क्यांची वाढ झाली आहे. इंधन पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीमध्ये देखील वाढ होऊन महागाईचा दर ३७.१८ टक्क्यांवरून ३९.८१ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच भाजीपाल्याच्या ठोक किमतीमध्ये १.६८ टक्क्यांची वाढ झाली आहे. धातू आणि इतर गोष्टींचे देखील भाव वाढले आहेत. अनेक वस्तूंचा कच्चा माल वाढल्याने वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.
दरम्यान सरकारकडून महागाईवर नियंत्रण मिळवण्याच प्रयत्न सुरू आहे. भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी याबाबत बोलताना सांगितले की, केंद्र आणि आरबीआयकडून महागाईचा दर कसा नियंत्रित राहिल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर गेल्या चार नोव्हेंबरला पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये कपात करण्यात आली होती. त्यामुळे पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले. दरम्यान भविष्यात देखील महागाई नियंत्रणात आणण्याच्या दृष्ट्रीकोणातून मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात असे संकेत त्यांनी दिले आहेत.