मुंबई APMC मार्केटमध्ये इराणी सफरचंद जोमात; काश्मीर शेतकरी कोमात
मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये इराणी सफरचंदांची आवक सुरु झाली असून काश्मीर सफरचंद मात्र विक्री विना पडून असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. इराणी सफरचंद   ७५ ते ८० रुपये प्रतिकिलो तर काश्मीर सफरचंद ८० रुपये प्रतिकिलो विकले जात आहेत. मात्र, असे असताना इराणी सफरचंदना अधिक मागणी आहे. तर काश्मीर सफरचंद मार्केटमध्ये विक्रीविना पडून आहेत. त्यामुळे काश्मीर शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. तर स्वतःचा माल स्टोरेजला साठवून इराणी सफरचंद संपण्याची वाट काश्मीर शेतकरी पाहू लागले आहेत.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये सध्या परदेशी सफरचंदांचा हंगाम सुरू झाला आहे. भारतातील सफरचंदांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. इराण येथून सफरचंद बाजारात मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत. सफरचंद खायला गोड रंगाने लाल आणि दिसायला आकर्षक तसेच आरोग्यासाठी गुणकारी समजले जाते. त्यामुळे सफरचंदाला वर्षभर मागणी असते. सध्या बाजारात इराणी सफरचंदाला मोठी मागणी आहे. किरकोळ बाजारात इराणी सफरचंदाला दर्जानुसार १२० ते १८० रुपये किलो भाव मिळत आहे. डिसेंबर ते मार्च दरम्यान परदेशी फळांचा हंगाम असतो.
यामध्ये इराण आणि तुर्कीचे सफरचंद मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होतात. अफगाणिस्तानमधील अस्थिर वातावरणामुळे महिनाभरापूर्वी इराणी सफरचंद बोटीने मुंबईतील बंदरात पाठविण्यात येत होती. तेथून देशभरात ती सफरचंद विक्रीस पाठविली जात होती. अफगाणिस्तानमधील वातावरण निवळल्यानंतर इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तानमार्गे अटारी सीमेवरून वाहनांमधून इराणी सफरचंद उत्तर भारतातील बाजारपेठेत पाठविण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील बंदरात तसेच अटारी सीमेवरून इराणमधीलसफरचंद सध्या बाजारात विक्रीस पाठविण्यात येत असून, आवक वाढल्याने गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत इराणमधील सफरचंदांचे दरही कमी झाले असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.