मुंबई APMC मार्केटमध्ये क्यूआर कोड प्रक्रियेचा शुभारंभ
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डिजिटल क्यूआर कोडने देयक भरण्याची सुरुवात आज करण्यात आली. मार्केटच्या प्रत्येक जावक प्रवेशद्वारावर हि प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता क्यूआर कोडने पेमेंट करावे लागणार आहे. सध्याच्या आधुनिक जगात मुंबई बाजार समितीने हे पाऊल खूप लवकर उचलणे अपेक्षित होते. तर आज या प्रक्रियेचा शुभारंभ करून प्रगतीच्या दृष्टीने बाजार समितीने एक चांगले पाऊल टाकले आहे. बाजार समितीमध्ये अनेक आर्थिक व्यवहारातील अनियमितता दिसून येत होती. या प्रक्रियेने त्याला चाप बसणार आहे.
बाजार समितीच्या उत्पन वाढीच्या दृष्टीने हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे बोलले जात आहे. तर अनेक गैरप्रकारांना रोखण्यासाठी आणि बाजार समितीच्या विकासाच्या दृष्टीने  विविध पाऊले उचलण्यात येणार असल्याचे प्रभारी सचिव संदीप देशमुख यांनी सांगितले.