नवी मुंबईत महापालिकेला महाविकास आघाडी निश्चित; लवकरच ठरणार जागा वाटप
येत्या काही दिवसांत येऊ घातलेल्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीमुळे सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रभाग रचनेवर केलेल्या विधानाबाबत आघाडीमधील पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते. या धर्तीवर नवी मुंबई सानपाडामधील वडार भवन येथे नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची बैठक पार पडली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. शिवाय नव्या फॉर्म्युल्यावर एकमत झाल्याची माहिती समोर येत आहे.
नवी मुंबईत महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून ज्याला मागच्या निवडणुकीत जास्त जागा मिळाल्या होत्या त्यानुसार या निवडणुकीत जागावाटप होणार आहेत. त्यामुळे भाजपसाठी हे मोठं आव्हान असणार आहे. या बैठकीत येणाऱ्या निवडणुकीत काय रणनिती असेल, यावर सविस्तर चर्चा झाली. जिथे जो उमेदवार निवडूण येईल तशा उमेदवाराला उमेदवारी देण्यासा प्रधान्य देणार असल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र या बैठकीत कोणता पक्ष किती जागा लढणार यावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे शिवसेना नेते विजय चौगुले यांनी सांगितले. नवीन प्रभागरचना आल्यानंतरही याबाबत आणखी काही महत्वाच्या बैठका पार पडणार असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देण्यात आली आहे.
आज नवी मुंबईतील महाविकास आघाडीच्या चर्चेत एकत्र लढण्यावर एकमतही झाले आहे. या बैठकीला शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, संदीप सुतार हे उपस्थित होते. भाजप नेते गणेश नाईक यांना शह देण्यासाठी महाविकास आघाडीने नवीन रणनीती आखली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत गणेश नाईक आणि भाजपसाठी हे कडवे आव्हान ठरणार आहे.