मुंबई APMC भाजीपाला मार्केट संचालक दुसऱ्याचे घर उध्वस्त करून स्वतःचे घर बांधत आहेत; संचालक अशोक वाळुंज
मुंबई APMC कांदा-बटाटा मार्केट संचालक आणि व्यापारी प्रतिनिधी भाजीपाला मार्केटमध्ये दौरा तर कांदा-बटाटा आणि लसणाचा व्यापार पाहून हैराण
मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये नियमितपणे कांदा बटाटा आणि लसणाचा व्यापार केला जातो. याबाबत एपीएमसी न्यूजने सतत बातमी करून या व्यापारामुळे कशापद्धतीने बाजार समितीचा सेस बुडत आहे हे दाखवून दिले होते. यावर थेट शेतकऱ्याच्या शेतमाल पट्टीच्या पुराव्यासह एपीएमसी न्यूजने गुरुवारी ३ मार्च रोजी बातमी दाखवली. या बातमीचा इम्पॅकट म्हणून आज कांदा बटाटा मार्केट संचालक अशोक वाळुंज याच्या नेतृत्वाखाली व्यापारी प्रतिनिधी आणि भाजीपाला मार्केट उपसचिव यांनी भाजीपाला मार्केटमधील कांदा-बटाटा व्यापाराची पाहणी केली. या पाहणी दरम्यान या ठिकाणी सप्लाय ऐवजी कांदा-बटाटा किरकोळ व्यापार होत असल्याचे निदर्शनास आल्याने या अनधिकृत व्यापारावर कारवाई करून शेतमाल जप्त करण्याची मागणी अधिकृत कांदा-बटाटा व्यापाऱ्यांनी केली आहे.
तर या अनधिकृत व्यापाऱ्यांकडून व्यापार करण्यासाठी प्रत्येकी ५० हजार रुपये घेतले असून दरमहा प्रोटेक्शन मनी देखील घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या व्यापाऱ्यांवर कारवाई केवळ दिखावा असून कायमस्वरूपी कारवाई करण्यात येत नाही. तसेच केवळ सप्लायसाठी येथील २२ व्यापाऱ्यांना बाजार समितीकडून परवानगी देण्यात आली होती. ते देखील सप्लायच्या नावाखाली किरकोळ व्यापार करताना निदर्शनास आले. तर काही व्यापारी थेट शेतमाल मागवत असल्याचेहि स्पष्ट झाले आहे.
तर भाजीपाला मार्केटमध्ये चारही विंग मध्ये ६० ते ७० व्यापारी बेकायदा कांदा-बटाटा व्यापार करत आहेत. या ठिकाणी होत असलेला गैरप्रकार बंद करण्याचा तीव्र इशारा कांदा-बटाटा मार्केट व्यापाऱ्यांनी दिला आहे. तर मार्केट संचालक अशोक वाळुंज यांनी उपसचिव मारुती पवितवार यांना लेखी पत्र देऊन संबंधित विषयांचा खुलासा तीन दिवसात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच संबंधित विषय येणाऱ्या ९ मार्च रोजी होणाऱ्या बोर्ड मिटिंगमध्ये घेण्यात येणार असल्याचे अशोक वाळुंज यांनी सांगितले.
भाजीपाला मार्केट संचालकांच्या आशीर्वादाने या ठिकाणी अवैध व्यापार चालतो. सप्लायच्या नावाखाली या ठिकाणी कांदा-बटाटा माल साठवून ठेवला आहे. ७ नंबर गेटमधून विना नोंद कांदा-बटाटा माल या मार्केटमध्ये आणला जातो. त्यामुळे भाजीपाला मार्केट संचालक शंकर पिंगळे दुसऱ्याचे घर उध्वस्त करून स्वतःचे घर बांधत असल्याचा आरोप कांदा बटाटा मार्केट संचालक अशोक वाळुंज यांनी या पाहणी दौऱ्यात केला.