नरेंद्र पाटील होणार अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
नरेंद्र पाटील होणार अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
नवीमुंबई दि.२५ : ज्यांनी आपले संपूर्ण जीवन कष्टकरी जनतेला समर्पित केले आणि आधुनिक महाराष्ट्र घडविण्यासाठी मोलाचे योगदान दिले   असे स्व.अण्णासाहेब पाटील हे आपल्या सर्वांना दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्व.अण्णासाहेब पाटील यांना आदरांजली अर्पण केली, ते अण्णासाहेब पाटील यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त नवी मुंबईत कांदा-बटाटा मार्केट येथे महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्यावतीने आयोजित केलेल्या माथाडी कामगारांच्या भव्य मेळाव्यात बोलत होते. ते पुढे असेही म्हणाले की, अण्णासाहेबांनी कामगारांसाठी अतोनात मेहनत, ऐतिहासिक कायदे निर्माण केले. आज त्यांच्या जयंतीनिमित्त मी ग्वाही देतो आमचं सरकार गरीब, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे. प्रसंगी सर्वसामान्य जनतेसाठी कायदा बदलण्याची वेळ आली तरी आम्ही कायदा बदलण्याची वेळ आली तरी आम्ही कायदा बदलणार आणि माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी तत्काळ प्रयत्न करू, तर माथाडींचे नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावर केलेल्या कामाबद्दल त्यांचे कौतुक करून आता पुन्हा एकदा त्यांना त्या मंडळाचे अध्यक्षपद देण्याचे घोषित केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी आमचे सरकार सकारात्मक निर्णय घ्यायचे माथाडी कामगारांचे अनेक उर्वरित प्रश्न आताही मुख्यमंत्री, मी स्वत: आणि कामगार मंत्री सुरेश खाडे असे तिघे मिळून सोडवू. पुढे त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी ५० हजार तरुणांना महामंडळाच्या वतीने व्यवसाय उपलब्ध करून दिला, याबद्दल त्यांचे त्यांनी आभार मानले व पुन्हा त्याच अध्यक्षपदावर सरकारमार्फत नियुक्ती करण्याचेही जाहीर केले. शेवटी ते म्हणाले की माथाडी कामगारांच्या अपप्रवृत्ती फोफावली असून ती दूर करण्यासाठी कारवाई करू व त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही.
कामगार मंत्री सुरेश खाडे यावेळी बोलताना म्हणाले कि मी एक कामगार होतो, मला या चळवळीची माहितीआहे. मी आमच्या सरकारककडून माथाडी कामगारांच्या   प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहीन. नाशिक येथील लेव्हीचा प्रश्नही नक्कीच सोडवू. संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील म्हणाले की, माथाडी कामगारांच्या कामात सराईत गुन्हेगारी वाढत चालली असून, खोटे अर्ज करून पैसे घेतात, हप्ते घेतात आणि खंडणी वसूल केली जाते. याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री असताना माथाडी कामगारांसाठी तत्परतेने ज्या योजना राबविल्या, प्रलंबित प्रश्न मार्गी लावले त्याबाबत त्यांचे आभार मानले, नरेंद्र पाटील पुढे म्हणाले की, संघ आणि माथाडी कामगार चळवळ यामध्ये काही फरक नाही आणि म्हणूनच मी संघाचही काम करतो व हिंदुत्वाचा द्वेष करणार्यांना तोडीस तोड देवू असेही नम्रपणे सांगितले. 
माजी मंत्री गणेश नाईक यांनी या सभेला संबोधित करताना म्हणाले की, मी जनतेसाठी काम करणाऱ्या माथाडी कामगारांना न्यायापासून वंचित न ठेवता तत्परतेने या सरकारने त्यांचे प्रश्न सोडवावे अशी अपेक्षा आज मी अण्णासाहेबांसारख्या महान नेत्याच्या जयंतीनिमित्त व्यक्त करतो. मी कामगार मंत्री असताना माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न तत्काळ सोडविले आणि आताचे सरकारही सोडवेल याबद्दल शंका उपस्थित करता येणार नाही. मी अण्णासाहेब यांना पुन्हा एकदा वंदन करतो. 
माथाडी युनियनचे कार्याध्यक्ष माजी मंत्री व आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, प्रश्न तेच आहेत, सरकार बदलत पण प्रश्न सुटत नाहीत, अण्णासाहेबांचा रुबाब, वजन आणि कामगारांसाठी अहोरात्र काम करण्याची पद्धत यामुळे अनेक प्रश्न सरकारमार्फत त्वरित सोडविले जायचे. पण त्यावेळी माथाडी कामगारांच्या दोन चार संघटना होत्या आज जवळपास दीडशे संघटना आहेत व माथाडी क्षेत्रांत अनेक अपप्रवृत्तींनी शिरकाव केला आहे. कै. अण्णासाहेब पाटील व कै.शिवाजीराव पाटील यांनी त्यावेळी अशा अपप्रवृत्तींना रोखले होते. पण आजही अण्णासाहेबांची माथाडी संघटना महत्वाची मानली जाते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व ते म्हणाले की, आम्ही संघटनेचे सर्व पदाधिकारी अण्णासाहेबांच्या विचार-आचार आणि शिकवणुकीनुसार संघटना पुढे नेण्यासाठी सतत काम करतो, त्यांनी तमाम माथाडी कामगारांना आवाहन केले की, त्यांनी आपली संघटना एकजूट व अधिक बलाढ्य करून त्यांच्या ऐतिहासिक कार्याचे जतन करावे हीच अण्णासाहेबांच्या आजच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली ठरेल.
यामेळाव्याचे सूत्र संचालन युनियनचे संयुक्त सरचिटणीस श्री. पोपटराव देशमुख यांनी केले. या मेळाव्यास आमदार मंदाताई म्हात्रे, माजी आमदार कृपाशंकर सिंह, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार महेश शिंदे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी आमदार विजय सावंत, माजी महापौर सागर नाईक, सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, बाजार समितीचे सभापती अशोक डक, सचिव संदीप देशमुख, माथाडी हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. हणमंतराव पाटील, माजी नगरसेविका शुभांगी पाटील, शशिकला पाटील, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरात, माजी नगरसेवक रवींद्र इथापे, माथाडी पतपेढीचे व्यवस्थाकीय संचालक रमेश पाटील, माथाडी युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, दिलीप खोंड, ऋषिकांत शिंदे, आनंद शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष सुर्यकांत पाटील, युनियनचे कायदेशीर सल्लागार भारतीताई पाटील, नवीमुंबई महानगरपालिकेचे आजी माजी नगरसेवक माथाडी चळवळीवर प्रेम करणारे नवीमुंबई व इतर ठिकाणचे समाजसेवक उपस्थित होते.
या वेळी गुणवंत १८ कामगारान मंत्री महोदयांच्या हस्ते माथाडी भूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.