नववर्षाच्या तोंडावर नवी मुंबई पोलिस गुन्हे शाखेची मोठी कारवाई; अडीच किलो एमडी ड्रग्स जप्त
ख्रिस्ती नवीन वर्षाच्या तोंडावर साजऱ्या केल्या जाणाऱ्या पार्ट्यांसाठी ड्रुग्स पुरवठा करणाऱ्या आरोपींना नवी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई गुन्हे शाखा पोलीस आणि अमलीपदार्थ विरोधी कक्ष व अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष यांनी संयुक्तरित्या कारवाई करून अमली पदार्थ ताब्यात घेतले आहेत. ३१ डिसेंबरच्या पार्ट्यांना तरुणांना ड्रुग्स विक्रीसाठी आणणारा आरोपी कलिमरफिक खामकर याला “एमडी” या अमलीपदार्थसह अटक करण्यात आली. तसेच पुढील तपासात त्याचे सहकारी जकी अफोरोज पिट्टू व सुभाष रघुपती पाटील यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर या आरोपींकडून अडीच किलो ड्रग्ससह जवळपास ३ कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना ५ जानेवारीपर्यंत कोठडी देण्यात आली आहे.
सुभाष पाटील हा केमिकल इंजिनीअर असून मल्टी नॅशनल कंपनीत नोकरी करत होता. मात्र, झटपट पैसे कमावण्याच्या इच्छेने त्याने हि नोकरी सोडून हा कारखाना सुरु केला होता. पहिल्यांदा पाच किलो ड्रुग्स निर्माण करण्यात आले. परंतू त्यात त्याला अपयश आले. मात्र आता निर्माण केलेले ड्रग्स प्युअर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नवीन वर्षांच्या पार्ट्यांसाठी या अमली पदार्थाचा पुरवठा केला जाणार होता. तर शॉर्टकट पैसे मिळवण्यासाठी सुभाष पाटील या आरोपीने पनवेल परिसरात दिड वर्षांपूर्वी ड्रुग्स फॅक्टरी टाकली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या ठिकाणी ५ किलो ड्रुग्स बनवण्यात आले आहे. या वर्षात जवळपास ४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांकडून देण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, सह पोलीस आयुक्त डॉ. जय जाधव, अप्पर पोलीस आयुक्त महेश घुर्ये सहायक पोलीस आयुक्त विनायक वस्त, पोलीस उप आयुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघन माळी, अमली पदार्थ विरोधी कक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी एस सय्यद, पराग सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक विजय शिंगे, सहायक पोलीस उपनिरीक्षक इनामदार, पोलीस हवालदार मोरे, कोळी, उटगीकर, पिरजादे, कांबळे, पोलीस नाईक पाटील जेजुरकर, फुलकर, बोरसे, जोशी, मोरे, सोनवलकर किरण पाटील व पोलीस शिपाई ठाकूर यांनी हि कामगिरी केली.