Navi Mumbai Water Taxi: नव्या वर्षात नवी मुंबईकरांना गिफ्ट, जानेवारी पंतप्रधानांच्या हस्ते वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन!
मुंबई व नवी मुंबई करांसाठी नव्या वर्षात एक झक्कास गिफ्ट आहे. बहुप्रतिक्षित वॉटर टॅक्सी सेवेचे (Water taxi Service) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते जानेवारी महिन्यात होणार आहे. या टॅक्सीद्वारे मुंबई ते नवी मुंबई असा प्रवास अत्यंत कमी वेळेत करता येईल. आतापर्यंत मुंबईहून नवी मुंबईपर्यंत केवळ रस्ते आणि रेल्वेमार्ग उपलब्ध होता, आता मुंबईकरांना जलमार्गे प्रवासाचीही सुविधा उपलब्ध होणार आहे. मुंबई ते नवी मुंबईपर्यंत रस्ते मार्गाने जाण्यासाठी टॅक्सीद्वारे सव्वा तास ते पावणे दोन तास असा वेळ लागतो. मात्र नव्या वॉटर टॅक्सीद्वारे हा वेळ 30 मिनिटांपेक्षा कमी लागेल. तसेच मुंबईच्या वाहतुकीवरील ताणही कमी होऊ शकेल.
टॅक्सीच्या फेऱ्या आणि भाडे कसे?
– या वॉटर टॅक्सीद्वारे मुंबई ते नवी मुंबईतील दोन जेट्टीदरम्यान प्रवाशांना वाहतूक करता येईल. यात जेएनपीटी येथे एक स्टॉप असेल.
– दुसरी सेवा मुंबई ते रायगड जिल्ह्यातील रेवस दरम्यान असेल. मात्र या सुविधांसाठीचे भाडे काहीसे महाग आहे.
– जलमार्गाची ही सेवा खासगी ऑपरेटरकडे सोपवण्यात आली आहे. याचे भाडे प्रति प्रवासी, प्रति मिनिट, 45 रुपये एवढे सध्या ठरवण्यात आले आहे. म्हणजेच मुंबई ते नवी मुंबईचे भाडे 12,00 ते 15,00 रुपयांदरम्यान असेल. तर जेएनपीटीपर्यंतचे भाडे 750 रुपये असू शकते, अशी माहिती इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेस एलएलपीचे सोहेल कझानी यांनी दिली.
– ही सेवा वर्षातील 330 दिवस सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत असेल. पावसाळ्यात सेवा बंद राहील.
– या सुविधेकरिता सध्या 50 आसनी, 40 आसनी, 32 आसनी आणि 14 आसनी अशी चार जहाजे आहेत. याद्वारे 25 नॉट्सच्या वेगाने प्रवास करू शकतो.
एक दिवस आधी बुकिंग करावे लागणार
प्रवाशांना इथपर्यंत येण्यासाठी चर्चगेट, सीएसटी, नरिमन पॉइंट, गेट वे ऑफ इंडिया, डीसीटी, डॉकयार्ड, बेलापूर, नेरुळ आणि जेएनपीटी अशा विविध ठिकाणी पूल कॅब असतील. या शेअर अ कॅब तत्त्वावर असतील. त्यासाठी प्रति व्यक्ती 20 ते 30 रुपये भाडे आकारले जाऊ शकते. तसेच watertaximumbai.com या वेबसाइटवर तिकिटाचे ऑनलाइन बुकिंग एक दिवस आधी करावे लागेल, असेही संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड आणि सिडको यांनी एकत्रितपणे काम केले. मुंबई पोर्ट ट्रस्टने मुंबईतील फेरी वार्फ येथे डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल उभारले तर सिडकोने नवी मुंबईतील बेलापूर आणि नेरूळ येथील टर्मिनलचे बांधकाम केले. हे काम आता अंतिम टप्प्यात आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन केले जाईल. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई पोर्ट ट्रस्टमधील केमिकल टर्मिनलचेही उद्घाटन करतील आणि बंदरातील दुसऱ्या केमिकल टर्मिनलचे भूमिपूजन करतील.