राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांची सुनबाई सत्ताधारींच्या विरोधात; निवडणुकीत आली रंगत
सोलापूर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीतील चिन्ह वाटप करण्यात आलं आहे. सत्ताधारी नेत्यांच्या महाविकास पॅनेल विरूध्द दूध उत्पादकांच्या दूध संघ बचाव पॅनेलमध्ये यांच्यात निवडणूक होत आहे. सत्ताधारी महाविकास पॅनेलला कपबशी तर दूध संघ बचाव पॅनेलला रोडरोलरचे चिन्ह देण्यात आलं आहे. दूध संघाच्या निवडणुकीत काही दिग्गजांना उमेदवारी नाकारल्याने धक्का बसला आहे. सत्ताधारी आमदार संजय शिंदेंचे समर्थक असलेल्या राजेंद्रसिंह राजेभोसले यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या सूनबाईंनी विरोधी दूध संघ बचाव आघाडीकडून उमेदवारी स्वीकारल्यानं नाराजीचं वातावरण निर्माण झालंय.
राजेंद्रसिंह राजेभोसले हे मागील २५ वर्षांपासून दूध संघाचे संचालक होते. तर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या सुनबाई वैशाली साठेंना सत्ताधारी महाविकास आघाडीने उमेदवारी नाकारली आहे. संतप्त जिल्हाध्यक्षांच्या सूनबाई दूध संघ बचावच्या पॅनेलमधून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळं सत्ताधारी महाविकास पॅनेलमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय.
दूध संघाच्या निवडणुकीसाठी एकूण १७ पैकी १ जागा बिनविरोध झाली आहे. तर, एकूण ३१४ मतदार मतदान करणार आहेत. २६ फेब्रुवारीला होणार मतदान तर २७ फेब्रुवारीला होणार मतमोजणी होणार आहे. सोलापूर जिल्हा दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक संचालक मंडळातील १७ सदस्यांच्या निवडीसाठी होत आहे. खुल्या प्रवर्गातील बारा तर राखीव प्रवर्गातील पाच सदस्यांचा यामध्ये समावेश आहे
सोलापूर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत दूध संघाच्या माजी अध्यक्षासह सहकारातील दिग्गज नेत्यांना धक्का बसलाय. कारण निवडणूक अर्ज छानणीमध्ये २६ जणांचे अर्ज बाद ठरवण्यात आले होते. यामध्ये दूध संघाचे माजी अध्यक्ष दिलीप माने, विद्यमान संचालक दिपक माळी तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांचे दूध संघाचे स्वप्न भंगले आहे.