कांदा दरात घसरण सुरूच शेतकरी हवालदिल
कांदा दरात घसरण सुरूच शेतकरी हवालदिल  
कांदा दरवाढीकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांचा संयम सुटला असून शेतकऱ्यांची अखेरची आशा संपुष्टात आली आहे. गेली काही दिवसांपासून कांदा दरात सातत्याने घसरण सुरु असून राज्यातील कांदा शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांनी दरवाढ होईल या आशेने आतापर्यंत कांदा चाळीत कांदा साठवून ठेवला होता. मात्र राज्यातील अनेक ठिकाणी नव्या कांद्याची लागवड सुरु झाली तरी चाळीतील कांद्याला बाजारभाव मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 
सध्या शेतकऱ्यांनी कांदा खराब होण्यापेक्षा विक्रीस काढल्याने बाजार समित्यांमध्ये पुरेशी कांदा आवक सुरूच आहे. परिणामी, कांदा दरात घसरण सुरु असून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी ७ ते १४ रुपये प्रतिकिलो कांदा विकला जात आहे. कांदा-बटाटा मार्केटमध्ये एकूण १६० गाडी आवक झाली असून जवळ १०० गाडी कांदा बाजरात आला आहे. बटाटा १५ ते २२ रुपये आणि लसूण ४० ते ७० रुपये प्रतिकिलो विक्री होत आहे. महिन्याभरात १० से १२ रुपयांनी दर घसरल्याने शेतकऱ्यांना कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. 
जवळपास ९ महिने तळहाताच्या फोडाप्रमाणे कांद्याची काळजी घेऊन देखील पदरी निराशा आल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. कांदा चाळीतील ५० टक्के कांद्याची सड झाली असून उरलेल्या कांदा खराब होऊ लागला आहे. त्यामुळे अनेक बड्या शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होत आहे. दिवाळी दरम्यान झालेल्या दरवाढी नंतर परराज्यातील कांदा बाजार समित्यांमध्ये आल्याने दरात घसरण झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबई बाजार समितीमध्ये अधिक प्रमाणात कांद्याची आवक होत असून मागणी नसल्याने दरवाढीला ब्रेक लागल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर आणखी काही दिवस दरवाढ होणार नसल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.