गाडीवरील दंडाची रक्कम लवकरात लवकर भरा; अन्यथा न्यायालयीन कारवाई!
नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी ई चलानद्वारे कारवाई करुनही १३ लाख ७८ हजार चलनाची दंडाची रक्कम भरण्यात आलेली नाही. या ई चलनाच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांकडे दंड स्वरूपात ४८ कोटी ५० लाख रुपयांचे येणे आहे. मात्र बहुतांश वाहनांवर एकापेक्षा अनेक कारवाया होऊनही दंड भरला जात नसल्याने रक्कम वाढतच चालली आहे.
सध्या  वाहतूक विभागाकडून प्रत्यक्ष कारवाईदरम्यान दंड आकारणीसह ई-चलनाद्वारेही कारवाई केली जाते. अशा कारवाईनंतर संबंधित वाहनचालक किंवा वाहनधारक यांनी वेळीच दंडाची रक्कम भरणे अपेक्षित आहे. लाखोच्या संख्येने वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या दंडाची रक्क्म कोटींमध्ये गेली आहे. दंडाची रक्कम भरण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून अनेकदा सूचित करण्यात आले आहे. तरी सुद्धा प्रतिसाद न मिळाल्याने नाकाबंदीच्या माध्यमातून वाहनांच्या शोधमोहिमेची वेळ पोलिसांवर येणार असे दिसत आहे. शिवाय त्यांच्यावर न्यायालयामार्फत कायदेशीर कारवाईचे संकेत वाहतूक पोलीस उपायुक्त पुरषोत्तम कराड यांनी दिले आहेत. त्यामुळे वाहनचालक आणि मालकांनी दंडाची रक्कम न भरल्यास न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.