संसदेत राहुल गांधी आक्रमक; आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाईसह सदस्याला नोकरीची मागणी
केंद्राच्या वादग्रस्त नवीन कृषीकायद्याच्या विरोधात गेल्या वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनात बरेच शेतकरी मृत्युमुखी पडले. या मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी व सदर शेतकऱ्याच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी संसदेत केली. यावेळी ते म्हणाले की, मृत्यूमुखी पडलेल्या शेतकर्यांचा आकडा आपल्याकडे नसल्याचे सांगून केंद्रसरकार या विषयातून पळ काढत असल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी ५०० शहीद शेतकऱ्यांची यादी संसदेच्या पटलावर सादर केली.
कृषी कायद्याच्या विरोधातील झालेल्या आंदोलनात शेतकरी शहीद झाल्याचे सगळ्या देशाला माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समस्त देशाची व शेतकऱ्यांची माफी मागत आपली चूक स्वीकारल्याचे नमूद करत राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई वकुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची मागणी केली.
या बाबतीत ३० नोव्हेंबर ला विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे उत्तर देतांना केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले होते की शेतकऱ्यांच्या मृत्यूचा आकडा सरकारकडे नाही. परंतु आम्ही या शेतकऱ्यांची ओळख पटवली आहे. पंजाब सरकारने राज्यात जवळपास चारशे शेतकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली आहे. यापैकी १५२ शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी देखील देण्यात आली आहे. तसेच हरियाणा राज्यातील ७० शेतकऱ्यांची देखील एक यादी आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या कुटुंबांना त्यांचा हक्क देण्यात यावा अशी ठाम मागणी राहुल गांधी यांनी यावेळी केली.