निवडणुकीआधीच बोगस मतदारांना झटका; सीबीडी कार्यालयात गुन्हा दाखल

नवी मुंबई महापालिका निवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी निवडणूक विभागाकडून मतदान नोंदणीचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते. मात्र, या आवाहनाचा गैरफायदा घेत काही नागरिकांनी बनावट कागदपत्रांद्वारे बनावट नोंदणी केल्याचे समोर आले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे २२ बोगस व्यक्तीनी बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत नावे नोंदविण्याचा आणि मतदाता कार्ड मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. कोकण भवन येथील निवडणूक मतदार नोंदणी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे सदर प्रकार उघडकिस आला असून ज्या २२ बोगस व्यक्तींनी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी ऑनलाईन बनावट कागदपत्रे सादर केली आहेत. त्या सर्वाविरोधात सीबीडी पोलिसांनी बनावटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.
नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या काही महिन्यामध्ये होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात येणाऱ्या बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही विधानसभा मतदार संघातील मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार मतदार नोंदणी कार्यालयाकडून करण्यात येत आहे. तसेच नवीन मतदारांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने सादर केलेली कागदपत्रे तपासून त्यांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्याचे देखील काम करण्यात येत आहे. त्यानुसार १५१-बेलापूर या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरिक्षणाचा कार्यक्रम सध्या सुरु आहे. त्यामुळे मतदारांना आपली नावे मतदार यादीमध्ये दाखल करणे, नावात दुरुस्ती करणे किंवा वगळणे या कामासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म भरण्याचे काम सुरु आहे.
दरम्यान, २९ सप्टेंबर ते २८ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत १५१ बेलापूर मतदार संघातील राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टलवर नोंदणीसाठी प्राप्त झालेल्या ऑनलाईन अर्जाची कोकण भवन येथील मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाकडून पडताळणी करण्यात आली. यामध्ये अर्जदारांनी ऑनलाईन सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये आणि लाईट बिलामध्ये विसंगती असल्याचे आढळून आले. त्यामुळे मतदार नोंदणी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी महावितरणच्या ऑनलाइन साईटवरून लाईट बिलांची पडताळणी केली असता, सदर वीजबील दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर असल्याचे आढळून आले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी इतर अर्जाची तपासणी केली असता त्यातील २२ बोगस व्यक्तींनी बनावट वीज बिल तयार करुन ते राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टलवर सादर करुन मतदाता कार्ड मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे आढळून आले
त्यामुळे १५१- बेलापूर विधानसभा मतदार संघाच्या प्रभारी निवडणूक अधिकारी तथा नायब तहसीलदार राजश्री पेडणेकर यांनी २२ बोगस व्यक्तींच्या नावाची यादी सीबीडी पोलीस ठाण्यात सादर करून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी मतदार यादीत बोगस नाव नोंदवून मतदाता कार्ड मिळविण्याचा प्रयत्न करणान्या २२ व्यक्तींविरोधात बनावटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांचा आणि त्यांना बनावट कागदपत्रे तयार करून देणाऱ्यांचा शोध सुरु केला आहे.
भारत निवडणूक आयोगाने नागरिकांसाठी राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल (एनव्हीएसपी) नावाने ऑनलाईन नवीन मतदार नोंदणीची सुविधा देखील उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल साईटवर ऑनलाईन पध्दतीमध्ये कोणत्याही व्यक्तीला त्याची स्वतःची आवश्यक ती कागदपत्रे सादर करून स्वतःचे नवीन मतदान ओळखपत्र मिळविण्यासाठी नोंदणी करता येते. ऑनलाईन पध्दतीने नोंद झालेले फॉर्म संबंधीत विधानसभा निवडणूक अधिकारी कार्यालयात प्राप्त होतात. त्यानंतर मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) ऑनलाईन प्राप्त झालेल्या फॉर्म मधील अर्जदारांच्या पत्यावर जाऊन स्वतः कागदपत्रांची सत्यता पडताळणी करतात. तसेच त्याबाबतचा अहवाल मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात सादर करतात. त्यानंतर कार्यालयामार्फत ऑनलाईन डेटा एन्ट्री करुन मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्याने दिलेल्या अहवालानुसार ऑनलाईन राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टलवर नोंदणी केलेल्या अर्जावर पुढील कारवाई केली जाते.