धक्कादायक! मर्चंट सेंटरमधील पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण; लवकरच होणार कारवाई
मर्चंट सेंटरचा तपासणी अहवाल अतिक्रमण उपायुक्तांना सादर
मुंबई APMC परिसरातील मर्चंट सेंटर इमारतीमधील दुकानाला आग लागण्याची घटना घडली. त्यानंतर या भूखंडासह   इमारती बांधणीपासून पार्किंग जागेतील अतिक्रमण असे अनेक विषय समोर आले आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन प्रचंड गर्दी पाहायला मिळते. शिवाय मर्चंट सेंटर मधील व्यवसायिकांसह कर्मचाऱ्यांची वाहने येथील रस्त्यावर पार्क केली जातात. त्यामुळे साऱ्या देशाला पार्किंगचा प्रश्न सतावत असताना अशाप्रकारे अतिक्रमण करून पार्किंग गिळल्याने मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर याबाबत तपासणी अहवाल अग्निशमन विभागाने अतिक्रमण उपायुक्तांना सादर केला असून इमारतीवर लवकरच कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
भूखंड वाटप त्यातील अनधिकृत बांधकाम, पार्किंगसह विश्रामगृह आणि आरोग्य केन्द्र याचा वापर सुद्धा गोडाऊन म्हणून केला जात असल्याचे समोर आले आहे.   कृषी संबंधित कार्यासाठी देण्यात आलेला भूखंड सध्या वेगवेगळ्या व्यवसायांसाठी वापरला जात असल्याने सिडकोसह महापालिकेची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भूखंडवाटप रद्द करण्याकरिता सिडको प्रशासन उच्च न्यायालयात दाद मागत आहे. तर अनधिकृत बांधकामांबाबत महापालिकेची कार्यवाही सुरु असून तपासणी अहवाल अतिक्रमण उपायुक्त याना सादर करण्यात आला आहे. त्यामुळे आता उपायुक्त अतिक्रमण आणि आयुक्त काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.