सोयाबीन लवकरच गाठणार सत्तरी; शेतकऱ्यांमध्ये समाधान
सोयाबीनच्या दरात आता घट नाही तर वाढच होणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे आणखी दर मिळण्याच्या अपेक्षेने शेतकरी सोयाबीनची विक्री करत नसल्याचे दिसते. दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात सतत वाढ होऊन सध्या ६ हजार ७०० रुपये भाव सोयाबीनला मिळत आहे. तर लवकरच सोयाबीन सत्तरी गाठणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे. दिवाळीपूर्वी सोयाबीनला 4 हजार 800 रुपये दर होता. मात्र, मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने दरात वाढ होत आहे.
आतापर्यंत सोयाबीनच्या दराला घेऊन शेतकरी चिंतेत होता. पण आता अधिकची काळजी ही व्यापाऱ्यांना आणि पोल्ट्री धारकांना करावी लागणार आहे. कारण सोयाबीनचा पुरवठा हा कमी होत आहे. शेतकऱ्यांकडे सोयाबीन असतानाही ते विक्रीसाठी आणले जात नाही. म्हणूनच दरात कायम तेजी दिसत आहे. तर आयात केलेले सोयापेंड आणि सोयाबीन यांच्या दरात फार मोठी तफावत नसल्याने प्रक्रिया उद्योजक हे स्थानिक पातळीवरील सोयाबीनलाच अधिकची पसंती देत आहेत. त्यामुळे सोयाबीनच्या दरात सतत वाढ सुरु आहे.
दिवाळीनंतर दरामध्ये सातत्याने वाढ होत होती. अखेर सोयाबीनचे दर हे ६ हजार ७०० रुपयांपर्यंत गेले आहेत. ढगाळ वातावरणमुळे कमी होत असलेली आवक वाढू लागली आहे. त्याशिवाय प्रक्रिया उद्योजक आणि होणारी मागणी याचा फायदा शेतकऱऱ्यांना होताना दिसत आहे. त्यामुळे अजून काही दिवस शेतकऱ्यांनी प्रतिक्षा केली तर वाढीव दर मिळणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत.