सूर्यदर्शनाने बळीराजा सुखावला; हंगामी पिके बहरणार
काही दिवसांपासून वातावरणात धुक्याची चादर होती. परिणामी हंगामातील गहू, हरभरा या पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे उत्पादनात घट होणार आणि नेहमीप्रमाणे उत्पादनावर झालेला खर्च पुन्हा अंगावर येणार अशी भीती बळीराजामध्ये निर्माण झाली होती. अखेर शेतकऱ्यांना ज्याची प्रतिक्षा होती ते दिवस उजाडले असून आता लोकांना सूर्यदर्शन होऊ लागले आहे. त्यामुळे कीड-रोगराईचा प्रादुर्भाव कमी होऊन रब्बी हंगामातील पीके पुन्हा बहरतील असा आशावाद शेतकरी व्यक्त करीत आहेत. शिवाय मुबलक प्रमाणात पाणी असल्याने त्याचेही योग्य नियोजन करण्यावर शेतरकऱ्यांचा भर राहणार आहे.
गारपिट आणि ढगाळ वातावरण असेच चित्र गेल्या महिन्याभरापसून होते. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. विशेषत: मुख्य पीक असलेल्या हरभरा आणि गव्हावर याचा परिणाम झाला आहे. हरभरा पिकावर घाटीळीचा तर गव्हावर तांबोरा रोगाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत होता. यातच गेल्या पाच दिवसांपासून दाट धुके पडत होते. त्यामुळे ज्वारीवरही लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला होता. रब्बीतील सर्वच पिकांवर धोक्याची घंटा असताना सूर्यदर्शन झाल्यामुळे शेती कामांना सुरवात होणार आहे.
यंदा रब्बी हंगामातील पिके जोपासण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी असूनही त्याचा उपयोग होत नव्हता. प्रतिकूल वातावरणामध्ये पिकांना दिल्यास त्यामुळे अधिकचे नुकसानच होणार होते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्षा होती ती वातावरण निवाळण्याची मात्र आता सूर्यदर्शन झाल्याने शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. आता पुन्हा निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करण्याची नामुष्की ओढावू नये अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. ढगाळ वातावरणामुळे या पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव होऊन चिकटा वाढला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी निंबोळी अर्क १० हजर पीपीएम १० मिली किंवा डायमेथोएट ३० टक्के २० मिली प्रति 10 लि. पाण्यात मिसळून फवारणी करायची आहे. काही प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव आढळला गरजेप्रमाणे फवारणी करावी असे आवाहन कृषीतज्ञांनी केले आहे. त्यासोबतच आता पिकांच्या वाढीसाठी पोषक खतांची मात्रा द्यावी असा सल्लाही कृषी विभागाने दिला आहे.