मुंबई APMC मार्केटवर दहशती सावट!
मुंबई एपीएमसी मार्केट परिसरात जवळपास ५० हजार नागरिक प्रतिदिन कामानिमित्त येतात. तर लाखो नागरिकांचे ये-जा असते. मात्र, मार्केट परिसरातील महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही नसल्याने गंभीर घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एपीएमसी मार्केटमध्ये पाच बाजारपेठा असून फळ आणि भाजीपाला मार्केट वगळता इतर मार्केटमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले नाहीत. शिवाय माथाडी भवन, मर्चंट सेंटर, तुर्भे स्मशानभूमी परिसर, अतिरिक्त भाजीपाला मार्केट आणि कोपरीगावाकडून येणारा रस्ता हे एपीएमसी मार्केटमधील महत्वाची ठिकाणे असून येथे सुद्धा सीसीटीव्ही नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे मुंबई एपीएमसी मार्केटवर दहशतीचे सावट असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
२६/११ च्या घटनेला १३ वर्षे उलटून गेली तरीही अद्याप सुरक्षेबाबत नागरिकांना गांभीर्य दिसत नाही. मात्र, शहरावरील दहशतीचे सावट टाळायचे असेल तर आक्षेपार्ह हालचालींवर बारकाईने लक्ष असणे आवश्यक आहे. हे काम करण्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही असल्यास सुरक्षा यंत्रणेला देखील येऊ घातलेल्या संकटांचा अंदाज घेता येणार आहे. परंतू नागरिक आपल्या घर अथवा दुकानात आवर्जून सीसीटीव्ही यंत्रणा बसवतात. पण सभोवतालच्या परिसरात घडणाऱ्या घडामोडी माहित होण्यासाठी दुकान, कार्यालय अथवा घराबाहेर सीसीटीव्ही असणे आवश्यक आहे.
या परिसरात चालू असलेले अवैध धंदे आणि भाजीपाला आणि फळ मार्केटमधील बेकायदा वास्तव्य हे सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे. येथे राहत असलेल्या नागरिकांची कोणतीच रीतसर नोंदणी एपीएमसी प्रशासनाकडे नाही. अनेकवेळा येथील काही नागरिकांना विविध गुन्ह्यांमध्ये अटक झाली आहे. अमली पदार्थ विक्रीचे माहेरघर म्हणून एपीएमसी मार्केटची ओळख असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे.